करोनाच्या पार्श्वभूमीवर दहा राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संवाद साधला होता. यामध्ये छत्तीसगड, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पुडुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या १० राज्यांच्या जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि संबधित राज्यांचे मुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला होता.यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. लसीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लसी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे.

मोदीजी तुम्हाला उशीरा शहाणपण सुचलं आहे अशा शब्दांत मोदींवर टीका केली आहे. “मोदीजी तुम्हाला खूप उशीराने शहाणपण सुचलं आहे. लस वाया जाण म्हणजे एखाद्याचा जीव जाणं हे बरोबर आहे. जेव्हा सीरम आणि भारत बायोटेक लस बनवत होते तेव्हा तुम्ही त्याची नोंदणी का नाही केलीत? २१ जानेवारी पर्यंत का थांबलात? जेव्हा देशात लस तयार केली जात होती तेव्हा तुम्हा ती जगभरात वाटत होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? तेव्हा का नाही तुम्ही म्हटलं की पहिल्यांदा भारतीयांना लस देण्यात येईल आणि नंतर जगाला. करोनामुळे लोकांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला तुम्ही आणि तुमचं सरकार जबाबदार नाही का?” असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर परदेशात पाठलेल्या लसींवरुन टीका केली आहे. लसींसाठी सीरम आणि भारत बायोटेककडे आगाऊ नोंदणी का केली नाही असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी मोदींना विचारला आहे.