मुंबई : विदा केंद्रे, डिजीटल पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे. सर्जनशील उद्योगाचे केंद्रस्थान म्हणून केशरी अर्थव्यवस्था (ऑरेंज इकॉनॉमी) मजबूत करण्यात महाराष्ट्र आधारस्तंभाची भूमिका बजावत असून आत्मनिर्भर भारत बनण्याच्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असेल, या शब्दांमध्ये महाराष्ट्र स्थापना दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देण्याची ग्वाही दिली आहे.
महाराष्ट्र हा देशाच्या नागरी संस्कृतीचा प्रेरणास्रोत राहिला आहे. शौर्य, समाजसुधारणा आणि राष्ट्र उभारणीची परंपरा येथे खोलवर रुजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारापर्यंत महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. महाराष्ट्राला लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि संत परंपरेचे योगदान असल्याचे सांगून मोदी यांनी राज्याच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव केला आहे.
यंदाचे वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे नमूद करत प्रधानमंत्री मोदी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, महात्मा फुले यांची २०० वी जयंती, संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष आहे. राज्य सरकारने हे वर्ष ‘समता आणि सामाजिक समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मोदी यांनी तीन बाबींचा विशेष उल्लेख केला. महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान आणि पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण या घटनांनी महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर सन्मान वाढल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील औद्योगिक क्षेत्र उद्योग आणि नवोन्मेषाचे भविष्यवेधी केंद्र म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा उल्लेख करत मुंबई मेट्रो ‘ॲक्वा लाईन’ विस्तार, नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर आणि शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळेल असे स्पष्ट करत महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक :
गडचिरोलीसारख्या पूर्वी मागासलेल्या भागात होत असलेल्या गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करीत तेथील बदल ‘नव्या विकास पर्वाची सुरुवात’ असल्याचे प्रधानमंत्री यांनी नमूद केले. मराठवाड्यातील पाणी प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुभेच्छा देताना केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
महाराष्ट्र म्हणजे शौर्य आणि समर्पण :
यंदाच्या वर्षातील दुःखद घटनांचा उल्लेख करत मोदी यांनी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागरी संस्कृतीसाठी महाराष्ट्र हा प्रेरणेचा चिरंतन स्त्रोत राहिला आहे. महाराष्ट्र म्हणजे शौर्य आणि नीतीमूल्ये, समर्पण आणि बहुतआयामीत्व तसेच समाजसुधारणा आणि राष्ट्र उभारणीची गुंफण असल्याचे पंतप्रधानांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
