Analysis of PM Modi Petroleum Saving Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी देशवासीयांना केलेल्या आवाहनावर सध्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिका इस्रायल व इराण यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून चालू असलेल्या युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत असून त्याची झळ भारतालाही आता बसू लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून मोदींनी देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करावा, असं आवाहन केलं आहे. यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असंदेखील मोदींनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर एकीकडे विरोधकांकडून टीका होत असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळी उदाहरणं देऊन समर्थन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
रविवारी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मोदींच्या हस्ते तेलंगणातील ९ हजार ४०० कोटींच्या विकासकामांची पायाभरणी व उद्घाटनं करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदींनी देशाच्या ऊर्जा क्षेत्राबाबत भाष्य केलं. आखातात चालू असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसू द्यायचा नसेल तर नागरिकांनी पेट्रोलियम उत्पादनांचा कमी वापर करावा, विदेशी वस्तू टाळून जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, सोन्याची खरेदी कमी करावी असं मोदी म्हणाले आहेत. यामुळे या वस्तू विदेशातून आयात करण्यासाठी खर्च कराव्या लागणाऱ्या परकीय चलनाची मोठी बचत होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाकिस्तानचं उदाहरण!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचं समर्थन करताना त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानचं उदाहरण दिलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर आपलं मत मांडलं. “सगळ्यांनाच माहिती आहे की जगात अमेरिका-इस्रायल व इराणच्या युद्धामुळे तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये तर याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानात ४५० रुपये लिटर एवढा भाव पेट्रोलचा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा परिस्थितीतही आपला इंधन पुरवठा प्रभावित होऊ दिलेला नाही. आपल्याला पेट्रोल, एलपीजी मिळतोय. पण जर आपण हे संकट समजून घेतलं नाही आणि या इंधनाचा वापर योग्य प्रकारे केला नाही, तर मला वाटतं आपल्यालाही टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे पंतप्रधानांनी जे सांगितलंय, त्यावर देशातील सर्व नागरिकांनी अंमलबजावणी करायला हवी”, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं.
मोदींचं आवाहन संयुक्तिक – शैलेंद्र देवळाणकर
“मोदींनी केलेलं आवाहन संयुक्तिक आणि योग्य वेळेला केलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय सोन्याच्या आयातीत किंवा डेस्टिनेशन वेडिंगवर मिलियन डॉलर्स खर्च करत आहेत. फक्त जानेवारी २०२६ या एका महिन्यात भारतीयांना १२ बिलियन डॉलर्स किमतीचं सोनं आयात केलं होतं. सोन्याचा, तेलाचा व्यवहार प्रामुख्याने डॉलर्समध्ये केला जातो. जर आशियातली परिस्थिती चिघळली, तर आपल्याला महागातलं तेल डॉलर्समध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे सघ्याची परिस्थिती डॉलर्सची बचत करण्याची आहे”, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी एबीपीशी बोलताना दिली.
