पंढरीची वारी हाअखंड प्रेरणास्रोत ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; पंढरपुरातील पालखी मार्गाचे भूमिपूजन

पालखी मार्गावर राज्य सरकारने पालखी तळ उभे करण्याची सूचना केली.

पंढरपूरकडे येणाऱ्या पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळय़ात (ऑनलाइन) बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. कार्यक्रमस्थळी मंचावर नितीन गडकरी, व्ही. के. सिंह, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पंढरपूर : ‘‘पंढरपूरकडे जाणारे पालखी मार्ग हे भक्तीचे प्रतीक आहेत. या मार्गावरून जाणारे वारकरी भक्ती आणि शक्तीचा परिचय देतात, निर्मल वारीतून स्वच्छतेचा जागर करतात. सामाजिक सौहार्दाचे प्रतीक असलेल्या वारीत कोणाशीही भेदभाव होत नाही. ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ या घोषवाक्याचे प्रेरणास्रोत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि पंढरपूरकडे येणाऱ्या अन्य महामार्गाचे लोकार्पण सोहळय़ावेळी ते बोलत होते.

पंढरपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरचित्रसंवादाद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, रस्ते विकास राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

या वेळी मोदी यांच्या हस्ते आळंदी ते पंढरपूर (संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग) आणि देहू ते पंढरपूर (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग) या विस्तारित महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. आळंदी ते पंढरपूर या २२० किमी लांबीच्या महामार्गासाठी ६ हजार ६९३ कोटी रुपये खर्च येणार आहे, तर देहू ते पंढरपूर या महामार्गावरील उर्वरित १३० किमी लांबीच्या कामासाठी ४ हजार ४१५ कोटी रुपये खर्च येणार आहे. याच कार्यक्रमात पंढरपूरकडे येणाऱ्या म्हसवड ते पंढरपूर, कुर्डुवाडी ते पंढरपूर, सांगोला ते पंढरपूर, टेंभुर्णी ते पंढरपूर आणि पंढरपूर- मंगळवेढा- उमदी या पाच महामार्गाचा लोकार्पण सोहळादेखील पार पडला.

मोदी म्हणाले, की वारीची ही परंपरा राष्ट्र जोडणारी आहे. एवढी परकीय आक्रमणे झाली तरी या परंपरेत आजवर कधीही खंड पडलेला नाही. त्यामुळेच या परंपरेचे महत्त्व अजूनही टिकून आहे. रस्ते हे विकासाचे मार्ग असतात. पंढरपूरकडे येणाऱ्या या नव्या रस्त्यांमुळे केवळ सांस्कृतिक संपन्नता येणार नाही, तर या संपूर्ण भागाचाच विकास घडण्यास मदत होईल. ‘राम कृष्ण हरी’ असा जयघोष करत मोदींनी काही वेळ मराठीतून भाषण केले.

गडकरी यांनी या वेळी या नियोजित विस्तारित पालखी मार्गाची माहिती दिली. तसेच पालखी मार्गावर राज्य सरकारने पालखी तळ उभे करण्याची सूचना केली. हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालखी मार्गाच्या विकासात राज्य सरकार सहकार्य करेल, असे सांगत हे पालखी तळ राज्य सरकारतर्फे उभारू, अशी घोषणा केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषण सुरू करताना उपस्थित सर्वाचा उल्लेख केला, मात्र मंचावर उपस्थित देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करायचे विसरले. काही वेळाने त्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत त्यांचे नाव घेण्याचे चुकून राहिले, असे सांगितले. त्यांच्या या खुलाशानंतर कार्यक्रमात खसखस पिकली. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होती.

पालखी तळ उभारणार

पालखी मार्गावर पालखी तळ उभारण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. हे तत्काळ मान्य करत हे तळ राज्य सरकारतर्फे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi lays foundation stone for road projects in maharashtra temple town pandharpur zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना