PM Narendra Modi Marathi speech : पुण्यातील हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजेरी लावली. महिला संचालित असलेल्या पिंक पॉवर्ड मार्गिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. उद्या सकाळपासून ही मार्गिका नागरिकांच्या सेवेत हजर होणार आहे. दरम्यान, एकीकडे पुण्यात मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण होत असताना दुसरीकडे राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. याची जाणीव ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मराठीतून आश्वस्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून म्हणाले, “महाराष्ट्रातील दुष्काळाची मला माहिती आहे. राज्य सरकारने आगाऊ मदतसुद्धा दिली आहे. मी पीएम किसानचा निधी जमा केला आहे. अजिबात काळजी करू. आम्ही सारे शेतकऱ्यांसोबत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “मी देशवासियांना सांगू इच्छितो की सण-वार आले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांनाही लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या घरात दिवाळी साजरी होण्यासाठी मदत करा. संकटाच्या काळात दुष्काळातील नागरिकांना विसरू नका. आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करायचा आहे”, असं आवाहनही त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“दिवाळी अगदी जवळ आली आहे, सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित होतो जेव्हा आयुष्यात नवी सुविधा जोडली जाते. आज पुणेकरांसाठी अशीच संधी आहे. आज पुणे मेट्रोसाठी एका नव्या लाईनचं लोकार्पण होतं आहे. दहा वर्षांपू्र्वी मी पहिल्या कामाचं लोकार्पण केलं होतं. आता तिसरी लाईन सुरु होते आहे, यामुळे आयटी हबला मोठी मदत मिळणार आहे. जुने आणि नवे भाग मेटो जोडते आहे. मी पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं यासाठी अभिनंद करतो. पुणे शहराने कायमच देशाला आणि राज्याला नवी दिशा दिली आहे. कल्पकतेपासून उत्पादनापर्यंतच्या अनेक गोष्टी पुण्यात होतात. मेट्रोचं जाळं या ठिकाणी विणलं जातं आहे त्यामुळे पुण्याला आणखी गती आगामी काळात मिळणार आहे”, असं मोदी म्हणाले.
“विकसित भारतासाठी आम्ही कशा प्रकारे तिथे सोयी-सुविधा करतो आहोत ते या शहरावरून कळतं आहे. मेट्रो प्रकल्प कुठल्याही शहराचा दर्जा वाढवतोच. पुणे मेट्रोचा जेवढा विस्तार होतो आहे त्यामुळे वेळही वाचते आहे आणि पुण्यातल्या लोकांना सुविधाही उत्तम मिळते आहे”, असंही त्यांनी म्हटलं.
