Narendra Modi Post on Maharashtra Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपा आणि मित्रपक्षांचा विजय झाला आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरेंनाही भाजपाने चितपट केले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्याकरता देवेंद्र फडणवीसांनी जंग जंग पछाडले होते. दरम्यान, या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करण्यात आला नाही. परंतु, विजय निश्चित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.
“महाराष्ट्राचे आभार! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोणही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा”, असं म्हणत नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं.
