जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद

नगर : करोना प्रतिबंधासाठी नगर  जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी देशातील  निवडक  जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यातील उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्या वेळी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. नगरमधून जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सीईओ राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर  गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या रोखण्यासाठीचे प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, मनपा, जिल्हा परिषद आदी यंत्रणांच्या समन्वयाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, करोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या योजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे मन:पूर्वक ऐकले.

‘ब्रेक दी चेन’ आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहीम, करोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर, रुग्णालयाकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली, ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.

आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव करोनामुक्त केले. त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंचांना ऐकवल्याचा सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी या वेळी  दिली.

मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक

नगर  जिल्ह्याने केलेल्या करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधितीची माहिती घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालक सचिव आशीषकुमार सिंह यांनीही दूरध्वनी करून डॉ. भोसले यांचे कौतुक केले.