मराठी भाषा आणि साहित्याला पाठदुखीचा अतोनात त्रास -महेश केळुसकर

महेश केळुसकर यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रेटो यांना पत्र लिहिलं आहे

संग्रहित

मराठी भाषा आणि साहित्याला सध्या पाठदुखीचा अतोनात त्रास होतो आहे. हा त्रास दूर करावा या आशयाचं एक पत्रच कवी महेश केळुसकर यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रेटो यांना लिहिलं आहे. महेश केळुसकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांना गुरुवारी रात्री पाठदुखीचा त्रास होऊ लागला. हाच संदर्भ घेऊन केळुसकर यांनी मराठी भाषा आणि साहित्याला जडलेल्या पाठदुखीबद्दल काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. या मुद्द्यांचा साहित्य संमेलन अध्यक्ष दिब्रेटो यांनी भाषणात समावेश करावा अशीही विनंती त्यांना केली आहे. तसंच फादर दिब्रेटो यांना आराम पडावा अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

काय आहे  महेश केळुसकर यांचं पत्र?

प्रिय फादर,

तुमचे अध्यक्षीय भाषण तयार असेलच.
तुम्हाला पाठदुखीचा खूप त्रास होत असल्याचे समजले. लौकर आराम मिळो आणि संमेलनही सुरळीत पार पडो, ही प्रभुचरणी प्रार्थना!
मराठी भाषा आणि साहित्यालाही सध्या पाठदुखीचा अतोनात त्रास होतो आहे. तो लक्षात ठेऊन भाषणात पुढील मुद्दे ठळक करता आले तर आनंद होईल.कृती कार्यक्रम ठरविण्याचे आवाहनही महामंडळाला करावे. नसल्यास , ये रे माझ्या मागल्या प्रमाणे हे संमेलनही बोलबच्चन पंक्तीत जाऊन बसेल.

१) येत्या मराठी राजभाषा दिवसापूर्वी , मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासंबंधीचा निर्णय केंद्राने घ्यावा म्हणून , महाराष्ट्र शासनाने आणि महामंडळाने संयुक्तपणे दिल्लीत दबावगट निर्माण करावा. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन संसदेत एकमुखी मागणी करावी.

२) बारावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा महाराष्ट्र शासन निर्णय त्वरित पारित होऊन अंमलबजावणीस सुरुवात व्हावी. मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण का वाढलेय,याचा विचार होऊन प्रशासकीय कृती कार्यक्रम सरकारने जाहीर करावा. भाषा प्राधिकरण त्वरित स्थापन करण्यात यावे.

३) शंभर वर्षे पूर्ण केलेल्या सर्व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी वेतनश्रेणी १ में २०२० पासून लागू करावी.अनुदान व्यतिरिक्त , हे वेतन शासनाकडून दिले गेले पाहिजे.

४) मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘मराठी भवन’ साठी स्वतंत्र जागा राखून ठेवावी.त्यामुळे स्मारक जागते राहील. व्यापक उद्देश सफल होईल.स्मारकाची निगराणी शासनाकडून नीट होईल.
विवेकवादाचे आपण पुरस्कर्ते आहात. लढाऊपणाही आपण वेळोवेळी दाखवला आहे.आणि आता मराठीसाठी लढण्याची वेळ आलेली आहे, म्हणून हा जाहीर पत्रप्रपंच!

जय मराठी!
आपला नम्र
महेश केळुसकर. / १०.०१.२०२०

कवी महेश केळुसकर यांनी हे पत्र त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याकडे त्यांनी मराठी भाषेची पाठदुखी दूर करा अशी मागणी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poet mahesh keluskar wrote a open letter on facebook to francis debrito regarding marathi literature scj