बैलगाडी शर्यत प्रकरणी साताऱ्यात २८ जणांवर कारवाई

यासंदर्भात अंमलदार धनंजय दळवी यांनी फिर्याद दिली असून, सहायक फौजदार विजय जाधव तपास करत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वाई : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीत बैलगाडी शर्यतीचे  आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल करून तीन बैल व तीन चारचाकी वाहने, असा ४० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मायणीत बैलगाडा शर्यतप्रकरणी १७ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी (ता. २७) कारवाई होऊनही काल पुन्हा शर्यतीच्या आयोजनाचे धाडस संबंधितांनी केल्याने पोलिसांनी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्यने बैलगाडी शर्यतीचा आखाडाच उखडून टाकला आहे.

याप्रकरणी अफसर युनूस पठाण (रा. डिस्कळ, ता. खटाव), बाबूराव मोहन कदम (रा. चंचळी, ता. कोरेगाव), शिवाजी भागवत वावरे, अभिजित प्रकाश जगदाळे (दोघेही रा. कुमठे, ता. कोरेगाव), वर्धमान विलास येवले (रा. शेंदूरजणे, ता. कोरेगाव), चेतन देविदास खंदारे (रा. कोंढवले, ता. मुळशी, जि. पुणे), योगेश प्रकाश जगदाळे (रा. कुमठे, ता. कोरेगाव), आशुतोष प्रवीण भोसले, सूरज शिवाजी भोसले (दोघेही रा. एकसळ, ता. कोरेगाव), घनश्याम अनिल भोईटे, अजय तानाजी यादव (दोघेही रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव) यांच्यासह अन्य अनोळखी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बोरजाईवाडी गावाच्या हद्दीत बैलगाडय़ांच्या शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शर्यती बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार उपअधीक्षक गणेश किंद्रे, निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक अर्चना शिंदे, उपनिरीक्षक विशाल कदम, पोलिस अंमलदार किशोर भोसले, प्रमोद जाधव, धनंजय दळवी, मच्छिंद्र कोकणी, शंकर पाचांगणे व चव्हाण यांचे पथक बोरजाईवाडी गावाच्या हद्दीतील बुरूड माळ नावाच्या शिवारात कारवाईसाठी गेले. त्या ठिकाणी बैलांना क्रूर वागणूक देऊन बैलांच्या शर्यती भरवून त्यात प्रथम येणाऱ्या बैलगाडीवर आपसांत सट्टा लावून जुगार खेळत असताना वरील संशयित आढळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमध्ये तीन बैल व तीन चारचाकी वाहने, असा ४० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासंदर्भात अंमलदार धनंजय दळवी यांनी फिर्याद दिली असून, सहायक फौजदार विजय जाधव तपास करत आहेत. यापुढे याठिकाणी अशा बेकायदेशीर बैलगाडी शर्यती होऊ नयेत, म्हणून शर्यती भरविण्यासाठी तयार केलेला आखाडा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्यने उद्ध्वस्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच धोंडेवाडी—अनफळे गावांच्या दरम्यान रायगुडे मळा नावाच्या शिवारात  झालेल्या विनापरवाना व बेकायदेशीर झालेल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी १७ व्यक्तींना ताब्यात घेतले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police action against 28 in satara in bullock cart race case zws