कराडनजीकच्या विजयनगर येथील चंदनचोरीप्रकरणी चार संशयितांना शुक्रवारी सायंकाळी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले. चौघेही संशयित मध्यप्रदेशातील आहेत. त्यांना कराड परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे कराड शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. चंदनचोरीचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
सूरज पितूसिंग पवार (वय २०), रामकिशन नानक रजपूत (वय २७ दोघेही रा. पुरेना, साईनगर पन्ना), खडीलाल गिल्ली रजपूत (वय ३८) आणि मनबकास रजपूत (वय २२ रा. बुढा ता. कटणी, मध्यप्रदेश) अशी त्या चौघांची नावे आहेत. विजयनगर येथे २ एप्रिलला रात्री चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. या वेळी संशयितांनी वॉचमनला मारहाण करून बांधून ठेवले होते. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलीस संशयितांच्या मागावर होते. संशयितांचा माग लागल्यानंतर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथके संशयितांची शोध घेत होती. संशयितांना पकडताना धनाजी पिसाळ हे किरकोळ जखमी झाले. संशयितांबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर सूरज पवारसह चौघांना कराड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या साहित्याचीही तपासणी करण्यात आली. यात काही मोबाईल तसेच रोख रक्कम मिळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अटकेतील दोघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चंदन चोरीवेळी घडलेला प्रकार पाहता या चौघांशिवाय आणखी काही संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. चौघा संशयितांकडे सायंकाळपर्यंत कसून चौकशी सुरू होती. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांना अटक केली जाणार असल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले.