सातारा : कर्नाटकातून केवळ चोरीसाठी साताऱ्यात येणाऱ्या एका महिलेला शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहरात खरेदीच्या निमित्ताने दुकानात जाऊन जे हाताला लागेल ते घेऊन एसटीने पुन्हा कर्नाटकला पसार व्हायची. सातारा शहर पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. माधवी काशीराम राठोड (मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. चोरीचा मोबाइल तिच्याकडून जप्त केला आहे.
साताऱ्यातील एका मोबाइल दुकानात माधवी राठोड मोबाइल खरेदीसाठी गेली होती. यावेळी तिने ओढणीच्या आडून दुकानामधील नवीन मोबाइल चोरून नेला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीनंतर गुन्हे प्रकटीकरणचे पथक या चोरीचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी माधवी राठोड हिला शोधून काढले. ती कोरेगाव येथे पुन्हा आल्याचे समजताच पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडून चोरीचा १९ हजारांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने यापूर्वी सराफ दुकानातून दागिने हातचलाखी करून चोरून नेल्याचे सांगितले.
कनार्टकातून ती चोरीसाठी नेहमी साताऱ्यात येत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तिने आणखी कुठे अशा प्रकारे चोरी केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव विक्रम माने, पंकज मोहिते आदींनी य कारवाईत भाग घेतला.