Beed Police Bharti Incident : २०१२ मध्ये वडिलांनी ४१०० रुपयांनी सोयाबीन विकले होते. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये म्हणजे तब्बल १३ वर्षांनी सोयाबीन विक्री केली ती ३७०० रुपये क्विंटल. म्हणजे १३ वर्षांत सर्वत्र महागाई वाढत असताना सोयाबीनचा दर मात्र ४०० रुपयांनी घसरलेला. तेव्हा मनिष उमाळे यास त्यांच्या शेतकरी वडिलांनी सांगितले, ‘काहीही हो, पण शेतकरी होऊ नको’! सहा एकर बागायत शेती असणारा मनिष पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेला. तो वडिलांचा तो सल्ला मनात ठेवून. तो मूळचा जळगावचा. २०२२ मध्ये लष्कर भरतीसाठी तो मैदानी चाचणीसाठी उभारला होता. तीन वेळा भरतीमध्ये अपयश आलं. वाणिज्य शाखेतील या पदवीधर विद्यार्थ्यास शेतीच्या अर्थकारणातील आयात – निर्यातीमध्ये सरकारकडून होणाऱ्या चुकाही कळतात. तो म्हणतो, ‘उत्पन्न निघायची वेळ आली की, सरकार बाहेरून माल आयात करते. मग शेतमालाला भाव कसे मिळणार? शेतमालाला भाव नसल्याने परिस्थिती सुधारत नाही, मग दुसरा पर्याय राहत नाही. मैदानात धावावे लागते जीवाच्या आकांताने…
रात्री साडेआठ – नऊची वेळ असेल. छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात तशी निजानीज व्हावी अशीही वेळ नव्हे. पण सकाळी लवकर मैदानी चाचणी असल्याने मोठ्या सतरंजीवर डोक्याला पिशवी घेऊन अनेकांनी पाय लांबवलेले. काहींनी डोक्यावरून पांघरुण घेतलेले. पण काही जण मोबाईलशी चाळा करत बसलेले. काही जणांनी घरून आणलेली शिदोरी उघडलेली. उद्या सकाळी मैदानावर उतरायचे याचा ताण दिसू नये याची काळजी घेत सागर गजभिये जरासा सावरला. कला शाखेतील पदव्यूत्तर शिक्षण घेतलेला सागर येरंडगावचा. राज्यशास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतलेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये शिकलेला. पदवीधर झाला तेव्हा करोनाची टाळेबंदी सुरू झालेली. त्यामुळे फक्त परीक्षा दिली. उत्तीर्णही झाला. पुढे काही नोकरी मिळते का, याचा शोध घेतला.
‘एसआरपीएफ, ड्रायव्हर, कारागृहातील पोलीस अशा परीक्षा दिल्या. २०२४ मध्ये पोलीस भरतीमध्ये थांबला. एकाच वेळी तीन – चार पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक वेळी प्रत्येक अर्जासाठी ९९९ रुपये. म्हणजे चार – पाच हजार रुपये सहज जातात. पोलीस भरतीला येणारे बहुतांश जणांना हॉटेलमध्ये जाऊन जेवणे ही सुद्धा चैन वाटते. एखाद्या अनोळखी शहरात उतरल्यावर पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना मैदानापर्यंत जाण्यासाठी लागणारा ऑटोरिक्षा वाला बक्कळ पैसे घेतो. सागरचे आई – वडील शेतकरी. घरी दोन एकर बागायत शेती. अहिल्यानगर जिल्ह्यातील वारसूगावावरून तो जेव्हा पोलीस भरतीसाठी उतरला तेव्हा घराची परिस्थिती आठवत होता.
आपण निकषाला पात्र ठरू का, याविषयीची सारी माहिती या मुलांना पाठ असते. किमान १६५ सेमी उंची, ५० किलो वजन आणि छाती ८० फुगवून ८५ सेंमी. मैदानी चाचणीमध्ये १६०० मीटर व १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या चाचण्या होणार. यात गुणानुक्रमे पुढे राहण्यासाठी धावणे आलेच. याशिवाय लेखी परीक्षेची तयारी असे प्रारुप असणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उतरणे ही ग्रामीण भागाची अपरिहार्यता. बुलढाण्याहून आलेला विशाला मुके सांगत होता, ‘पाच एकराच्या कोरवाहू शेतीतून काय मिळणार? शेती जर उत्तम असती किंवा शेतमालास भाव असते तर अशी पळापळ कशाला करावी लागली असती. त्याला येण्यासाठी बस नव्हती. मग मोटारसायकलवरच आला. पोलीस झालो तर पिढीच घडते.’
पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम आणि मैदानातील सराव याचा ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करून घेणारे प्रत्येक तालुक्याला किमान दोन. पोलीस भरती ॲकडमी चालवणारे आता ऑनलाईन क्लासही खूप. ते खूप महाग आहेत असे नाही. पण त्याची उलाढाल तशी कमी नाही. परभणीमधील विठ्ठल कंगणे नावाचे गुरुजी या मुलांमध्ये कमालीचे प्रसिद्ध आहेत. ही शिकवणी ‘लॉकॉस्ट’ पण अधिक व्याप्ती असणारे प्रारुप. एका विद्यार्थ्यास २९ रुपये ऑनलाईन शुल्क. भरतीची संख्या लाखोच्या घरात. भरतीपूर्व तीन महिन्याची ही शिकवणी सध्या जोमात आहे. असे खूप सारे ऑनलाईन क्लास ही अध्ययन – अध्यापनाची प्रणाली. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, बुद्धीमत्ता आणि ‘जि.के’ असे अभ्यासाचे विषय. पण जेवढा जोर अभ्यासावर तेवढाच मैदानावर. वर्षभर धावण्याचा सराव करायला. गोळाफेक करत रहायचे. अलिकडे शहरात मैदाने नाहीत. पण शहरात जर मैदानावर सराव करायचा असेल तर ३०० रुपये लागतात. केवळ पोलीस भरतीच नाही तर सरकारी नोकरीच्या शोधात शहरात राहणाऱ्या अनेक तरुणांना ही रक्कम गावाकडून उभी करावी लागते किंवा मग कोठे तरी अर्धवेळ काम करायचे. ते मिळाले नाही तर?
