गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटापासून जिल्ह्याच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या राजापूपर्यंतच्या टापूमध्ये १९ बंदोबस्त छावण्या उभारण्यात येणार आहेत.

यंदाच्या वर्षी ५ ते १५ सप्टेंबर या काळात हा उत्सव असून दरवर्षी त्यासाठी राज्याच्या निरनिराळ्या भागांतून, विशेषत: ठाणे-मुंबई परिसरांतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी एसटी, खासगी आरामगाडय़ा किंवा अन्य वाहनांनी कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच काही वेळा अपघातही होतात. हे टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या टापूमध्ये १९ ठिकाणी खास छावण्या उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच वैद्यकीय सेवा देण्यासाठी परिचारिका, डॉक्टर आणि औषधोपचार साहित्यही ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सालाबादप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही प्रवासी व वाहनचालकांना चहा-पाणी देऊन ताजेतवाने करण्यासाठी सहभागी होणार आहेत.

महामार्गावरील बंदोबस्तासाठी ७२ पोलीस अधिकारी, ८०० कर्मचारी, तसेच बाहेरच्या जिल्ह्यांतून १० जादा अधिकारी, ४५० पोलीस आणि गृहरक्षक व राज्य राखीव दलाचे जवानही तैनात केले जाणार आहेत.

या उत्सवाच्या काळात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी येत्या १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत ट्रेलर, कंटेनर, १६ टनपेक्षा जास्त वजनाची सर्व प्रकारची अवजड वाहने, रेतीची वाहतूक करणारे ट्रक इत्यादी वाहनांना महामार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तसेच ६ ते १६ सप्टेंबर या काळात या वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मात्र दूध, भाजीपाला, पेट्रोल, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला यातून वगळण्यात आले आहे.