सध्या तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचच्या सदस्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी थेट तासगावला आंदोलन करून गृहमंत्री आर.आर. पाटील यांना लक्ष्य करण्याचा प्रकार विद्रोही चळवळीतील काहींनी सुरू केला असला तरी अटकेतील तरुणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पुण्यात सक्रीय असलेल्या कबीर कला मंचचे काही तरुण नक्षलवादी चळवळीत सक्रीय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सचिन माळी, शीतल साठे व अन्य काही तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून फरार असलेल्या या तरुणांनी ६ एप्रिल २०१३ ला मंत्रालयासमोर आंदोलन करून स्वत:ला अटक करून घेतली होती. यापैकी शीतल साठेची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सचिन माळी व इतर चार तरुण गेल्या १५ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. या सर्वाच्या सुटकेसाठी राज्यातील अनेक संघटना ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या संघटनांनी एकत्र येऊन गेल्या २० जुलैला गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या सांगली जिल्ह्य़ातील तासगावला एक परिषद घेतली. सचिन माळी व सहकलावंत मुक्ती परिषदेचे आयोजन करून थेट गृहमंत्र्यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न या वेळी झाला. यामुळे गृहखात्यात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन या परिषदेचे आयोजन जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे गृहखात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारणा केली असता सचिन माळी, शीतल साठे व इतर तरुणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे भक्कम पुरावे पोलिसांकडे आहेत, असे ते म्हणाले. या दोघांनी पुण्यातील अनेक तरुणांना चळवळीत सक्रीय केले. आज पुण्याचे चार तरुण गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ातील जंगलात कार्यरत आहेत. सध्या अटकेत असलेले तरुण सुद्धा २०१२ मध्ये नक्षलवाद्यांसोबत जंगलात वावरत होते.
या काळात त्यांच्यासोबत असलेल्या काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर ही बाब आणखी स्पष्ट झाली. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेचा अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या सदस्याने सुद्धा शरण आल्यावर या तरुणांच्या सहभागाची माहिती पोलिसांना दिली, तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांची ओळख सुद्धा पटवली. या दोन जिल्ह्य़ात या काळात झालेल्या हिंसक घटनांमध्ये सुद्धा या तरुणांचा सहभाग असल्याचे पुरावे आढळल्याचे कदम यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांच्या सहभागाची चर्चा
सध्या तुरुंगात असलेला सचिन माळी हा तासगावचा असल्याने व त्याला जाणीवपूर्वक नक्षलवादी ठरवल्याने गृहमंत्र्यांच्या विरोधात तासगाव परिषद घेतल्याचे आयोजक सांगत आहेत. या परिषदेत रिपाईचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी झाल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यानिमित्ताने नक्षलवादाशी संबंधित प्रकरणांचा प्रथमच राजकीय कारणांसाठी वापर होत असल्याचे दिसून आले आहे.