नगर शहरात काल, शनिवारी सायंकाळी मिरवणुकी दरम्यान व नंतर शहराच्या विविध भागांत झालेल्या दगडफेकीसंदर्भात दोन्ही बाजूच्या एकूण २३ जणांना अटक केली. त्यात ७ अल्पवयीन मुले आहेत. १६ जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न व दरोडय़ाच्या गुन्हय़ातील आरोपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना पाच दिवस (दि. ३ एप्रिल) तर पोलिसांवर दगडफेक करून पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीची मोडतोड करणाऱ्या गुन्हय़ातील ७ आरोपींना दोन दिवस (३१ मार्च) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. बेकायदा मिरवणुकीचा सूत्रधार व हिंदुराष्ट्र सेना संघटनेचा येथील अध्यक्ष दिगंबर गेंटय़ाल अद्याप फरारच आहे.
दरम्यान आज, रविवारी दुपारी अफवेमुळे पुन्हा शहराच्या बाजारपेठेत नागरिकांची व व्यापाऱ्यांची पळापळ झाली. कापड बाजार, माणिक चौक, तख्ती दरवाजा, चितळे रस्ता भागातील दुकाने बंद झाली होती. त्यामुळे लग्नाच्या बस्त्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम व अतिरिक्त अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी मोठय़ा फौजफाटय़ासह पाहणी केल्यावर पुन्हा व्यवहार सुरळीत सुरू झाले. दगडफेकीच्या अफवा दिवसभर सुरूच होत्या. सेनेचे माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींनीही व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
तेलीखुंट भागात झालेल्या दगडफेकीत पोलीस शिपाई गुणेश घुले यांच्या गुप्तांगाला दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले, ते रस्त्यावरच कोसळले होते. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवीपेठ भागात पोलीस शिपाई अभिजित आरकल यांच्या हातातील व्हिडिओ कॅमेरा जमावाने हिसकावून घेतला व त्यांच्या डोळय़ांत मिरचीची पूड टाकून शहराचे उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांच्या जीपवर (एमएच १६ एन ५९०) दगडफेक करण्यात आल्याने गाडीच्या काचांचे व बोनेटचे नुकसान झाले.
कोतवाली पोलीस ठाण्याचे अजय गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हिंदू राष्ट्र सेनेचा दिगंबर गेंटय़ाल व इतर १५० ते २०० कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस शिपायाच्या खुनाचा प्रयत्न, माणिक चौकातील दुकानदाराला लुटल्याचा (दरोडा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील २२ आरोपींची ओळख पटली आहे. यातील १३ जणांना अटक करण्यात आली आहे. महेश ऊर्फ बिटय़ा निकम, राजेंद्र सैंदर, महेश आहेर, दिनेश सैंदर, शिवाजी अनभुले, विनोद निस्ताने, योगेश गजेले, नीलेश गेंटय़ाल व शुभम गिरमे या नऊ जणांना दि. ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. अन्य ४ अल्पवयीन आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. दुसऱ्या गुन्हय़ात १०० ते १५० जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील रफीक मोहमद हनिफ शेख, असीफ अहमद नशीब शेख, मोहसीन इसामुद्दिन शेख, जुनेद फरीद शेख, निशाद जमील खान, मतीन अब्दुल शेख, साद अनन्वर वहीद अहमद खान या सात जणांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. उर्वरित तिघा अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. सरकारतर्फे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढिकले, सरकारी वकील सचिन सूर्यवंशी तर आरोपींच्या वतीने महेश तवले, राहुल पवार तसेच रोमन सय्यद व अभिजित कोठारी यांनी काम पाहिले.
कोणी पैसा पुरवला?
हिंदू राष्ट्र सेनेचे दिगंबर गेंटय़ाल यांनी रामनवमीची नगर शहरात परंपरा नसताना बेकायदा मिरवणूक काढली. उच्च न्यायालयानेही त्यांना परवानगी नाकारली होती. गेंटय़ाल यांना कोण प्रोत्साहन देत आहे, त्यांच्या मागे कोण आहे, मिरवणुकीला कोण पैसा पुरवत आहे, या सर्वामागे कोणाचा हात आहे, याचा पोलिसांना शोध घ्यायचा असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ढिकले यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
अशी झाली सुरुवात
बेकायदा मिरवणूक तख्ती दरवाजा भागात आल्यावर तेथे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम ‘हिंदूू, हिंदू’, ‘जय श्रीराम, जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेल्या टोळक्याने ‘या हुसेन, या हुसेन’ असे प्रत्युत्तर त्याला दिले. या घोषणा युद्धातून दोन जमाव एकमेकांस भिडले. तेथे उभी सामोसा विक्रीची हातगाडी उलथवण्यात आली. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी काठय़ा उगारताच पळापळ व दगडफेकीला सुरुवात झाली, असे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.