सांगली : खुनातील संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात नेले असता, त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित तरुणाला पिस्तुलासह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी सांगितले.मिरजेत गणेश तलावजवळ नितीन कलगुटगी याचा २७ ऑक्टोबर रोजी खून झाला होता. यातील संशयित सलीम पठाण याच्यासह चार जणांना मिरज शहर पोलिसांनी लोणावळा येथे ७ नोव्हेंबर रोजी पकडले. सध्या ते पोलीस कोठडीत असून, बुधवारी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले होते.
पठाण या संशयित आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळे पोलीस सतर्क होते. या वेळी एका संशयित तरुणाला पोलिसांनी झडप घालून पकडले असता, त्याच्याकडे पिस्तूल मिळाले. ते जप्त करण्यात आले. मात्र या दरम्यान, रुग्णालय परिसरात एक कोयताही पोलिसांना मिळाला असून, त्याच्यासोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता चौगले यांंनी वर्तवली. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगलीत तरुणाचा धारदार हत्याराने खून अश्लिल शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना मध्यरात्रीनंतर सांगलीतील आपटा पोलीस चौकीनजीक घोड्यांच्या तबेल्यात घडली. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमीर रावसाहेब कन्नुरे (वय ३३, रा. हनुमाननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री त्याने दोन मित्रांना अश्लिल शिवीगाळ केली होती. यानंतर याचा राग मनात धरून त्याच्याच दोन मित्रांनी त्याच्यावर तबेल्यातील पत्र्याच्या शेडमध्ये तो झोपला असताना एडक्यासारख्या धारदार हत्याराने वार केले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची माहिती घेतल्यानंतर दोघा संशयितांनाही आज पहाटे ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
