छत्रपती संभाजीनगर : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या घराची १०० पोलिसांनी झडती घेतल्याचा खासदार हेमंत पाटील यांनी केलेला दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे. या जिल्ह्यात दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले होते तसेच सात गुन्हेगारांच्या घराची झडतीही घेतली. मात्र, त्यात आमदार संतोष बांगर यांचे घर नव्हते असे पोलिसांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील निवडणुकामध्ये ‘ अवैध ’ धंदे हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. विशेषत: वाळूच्या अवैध व्यावसायातील अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान आमदार संतोष बांगर यांच्या घरात १०० पोलिसांनी झडती घेतल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला. ‘हिंगोली आणि कळमनुरी येथे शिवसेनेची ताकद भक्कम आहे. त्यामुळेच विरोधकांची पायाखालची वाळू सरकू लागली असून असे छापे राजकीय दबावाखाली टाकले जात आहेत. आमदारांच्या घरी छापा टाकण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते, मात्र अशी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, असा दावा त्यांनी केला.

राजकीय हेतून छापे टाकले जात आहेत का, असा प्रश्न राजकीय नेते विचारत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमदार संतोष बांगर यांच्या घरावर छापा टाकला गेला नाही. निवडणुकी दरम्यान ज्यांच्यावर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा जवळपास १४०० हून अधिक गुन्हेगारांवर पोलिसांची नजर आहे. काही जणांकडून शांततेबाबतचे शपथपत्रही घेण्यात आले आहेत. सात संशयित व्यक्तींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली असली तरी त्यात आमदार बांगर यांचे घर नव्हते. पोलीस निरीक्षकांनीही तसे कळवले आहे.’

हिंगोलीचे माजी नगरसेवक श्याम कदम, राम कदम यांच्या निवासस्थानी पाेलीस गेले होते. पण बांगर यांच्या घरी गेले नव्हते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, हिंगोलीचे आमदार हे सारे घडवून आणत असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान बांगर यांच्या घरावर छापा पडल्याच्या वृत्ताने ‘ महायुती’ मध्ये किती दरी पडली आहे, याचे संकेत लोकांपर्यंत जावे, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलिसांनी मात्र हे सारे दावे फेटाळून लावले आहेत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. १४६८ हून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

हिंगोलीचे पोलीस निरीक्षक संदीप मोडे म्हणाले, सात गुन्हेगारांच्या घराची झडती आम्ही घेतली आहे. यात मतदारांवर प्रभाव टाकता येईल असे काही साहित्य होते का हे तपासले आहे. त्याचे ‘ व्हिडिओ शुटींग’ही उपलब्ध आहे. त्यामुळे बांगर यांच्या घरावर छापा टाकलाच गेला नाही.