जवळपास ५० गंभीर गुन्हे दाखल असलेला, तसेच गेल्या २४ ऑक्टोबरला बीड शहरातील एका दुकानदाराला साडेदहा लाख रुपयांना लुबाडल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार श्याम भीमराव आठवले (वय ४०, माळीवेस, बीड) रविवारी भरदुपारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झाला. त्याचे दोन साथीदार पळून गेले, तर एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. गेवराई-शेवगाव रस्त्यावर दुपारी तीन-चारच्या दरम्यान हे थरारनाटय़ घडले.
बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून आठवलेच्या मागावर होते. आठवले हा त्याच्या तीन साथीदारांसह गेवराईत आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गेवराईत त्याला घेरले. परंतु तो साथीदारांसह मोटारीतून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर असतानाच आठवले याची मोटार मध्येच बंद पडली. या वेळी त्याचे दोन साथीदार पळून गेले. मात्र, आठवले याने गावठी पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. या चकमकीत आठवले गंभीर जखमी झाला. त्याच्या साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले. या चकमकीच्या वेळी व नंतरही पोलिसांनी शेवगाव-गेवराई रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. आठवले याला अत्यवस्थ अवस्थेत संध्याकाळी उशिरा औरंगाबादला हलविण्यात आले. मात्र, या चकमकीत आठवले ठार झाल्याची चर्चा होत होती.