रायगड जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक म्हणून मो. सुवेज हक यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. पोलीस दलातील जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सुवेज हक यांनी सांगितले.
ते पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलीस जवान, जनता, गुन्हेगारी आणि सागरी सुरक्षा ही आपल्या कामाची चतु:सूत्री राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी काही विशेष काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. रायगड जिल्ह्य़ाला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. या सागर किनाऱ्यावरून देशाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घेऊन सागरी सुरक्षेवर अधिक भर दिला जाणार आहे.
देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आज जवळपास सत्तर टक्के लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमाने इंटरनेटशी जोडले गेले आहेत. त्यामुळे सायबर क्राइमचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सायबर गुन्ह्य़ांचा तपास लावण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वत:ची सायबर लॅब स्थापन करण्याचा प्रयत्न असणार आहे. पोलीस दलातील सर्व वाहने जीपीएल प्रणालीने जोडणार असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस दलात पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न असून कायदा मोडणाऱ्या विरोधात ठोस कारवाई करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याकडे सर्वाना समान वागणूक असेल असेही त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्य़ात सध्या अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. त्याविरोधात मोहीम आखणार असून रेतीमाफियांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, त्यासाठी जिल्ह्य़ाच्या महसूल प्रशासनाशी समन्वय ठेवून काम करणार असल्याचे हक यांनी सांगितले. सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पोलीस आणि पत्रकार यांच्यात सुसंवाद कसा राहील याकडेही आपले लक्ष राहील. असेही सुवेज हक म्हणाले.
कोण आहेत सुवेज हक
सुवेज हक हे २००५ सालच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. ते मूळचे मध्य प्रदेशमधील बिलासपूरचे रहिवासी आहेत. सुवेज हक यांनी केमिकल इंजिनीअरिंग विभागाची पदविका धारण केली असून पोलीस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात त्यांनी एमबीए पदवी प्राप्त केली आहे. गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ मोडून काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर नवजीवन कॅम्पेन अंतर्गत त्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असणाऱ्या विभागात सर्वाधिक काळ काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.