महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकाटेंचे मंत्रि‍पद आणि आमदारकीही धोक्यात आली आहे. अशातच आता माणिकराव कोकाटेंबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर एक आरोप केला आहे आणि खळबळ उडवून दिली आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये म्हटले की, “माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं आहे आणि लपवलं आहे. मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवलेले आहे अशी परिस्थिती आहे. दोन वर्षाची शिक्षा झाली तर मताचा अधिकार संपुष्टात येतो. त्यांना कोणत्याही संवैधिका पदवार राहता येत नाही. न्यायालयाला न मानणारे हे आहेत. आता कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीस यांनी घ्यावी.” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

माणिकराव कोकाटेंचं प्रकरण नेमकं काय?

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात जोपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत अटकेची टांगती तलवार असेल. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. ॲड. माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून विविध कारणांमुळे वादात अडकले होते. शेतकरी कर्जमाफीबद्दल त्यांनी केलेले विधान किंवा विधिमंडळात मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रकरण असो, पक्षाने वेळोवेळी त्यांची बाजू सावरून घेतली होती. मात्र बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोकाटे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले.

सतत वादात सापडणारे माणिकराव कोकाटे कोण आहेत?

माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत.
१९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली.
२००४ मध्ये ते दुसऱ्यांदा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले.
२००९ मध्ये कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा आमदार झाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
२०१९ मध्ये कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
एकसंध राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर कोकाटे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना महायुती सरकारमध्ये कृषीमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.