शहरात सलग तीसऱ्या दिवशी तीन ठिकाणी चोरी झाल्याने धुळेकरांमध्ये अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे साई अपार्टमेंट या इमारतीमधील पोलिसाचे बंद घराचे कूलूप तोडून २० हजार रुपयांची रोख रक्कम, तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरण्यात आल्याने आता पोलिसांचे घरही चोरटय़ांपासून सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे.

शहरात घरफोडी, चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरूवारी मोराणे येथे एकाच कॉलनीतील दोन घरे फोडण्यात आली होती. शुRवारी सकाळी विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे दोन ठिकाणी चोरी झाल्याचे उघड झाले. मलेरिया कार्यालयाजवळ सिध्दीविनायक बेंटेक्स ज्वेलर्स या नावाचे पुखराज वर्मा यांच्या मालकीचे दुकान आहे. सकाळी साडेसहा वाजता वर्मा यांना दुकानाशेजारी राहणाऱ्या रहिवाशाने दूरध्वनी करुन दुकानाचे शटर अर्धे उघडे असल्याची माहिती दिली. वर्मा त्वरीत दुकानाकडे पोहचले असता त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे दिसून आले. चोरांनी दुकानातून ३० ते ४० हजार बेन्टेक्सचे दागिने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. धुळे शहर पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रण मिळवले असून त्यात तीन संशयीत आढळून आले. तिघा संशयितांनी तोंडाला रुमाल बांधले असून त्यातील एक जण अपंग असल्याचे दिसते. पहाटे पाच वाजून ४९ मिनिटे ते सहा वाजून ११ मिनिटे या वेळेत ही चोरी करण्यात आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुसरी चोरी याच भागातील मलेरिया कार्यालयामागील साई अपार्टमेंट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे हवालदार भिकाजी पाटील यांच्या घरात झाली. धुळे तालुका पोलीस ठाण्यात पाटील नेमणुकीस आहेत. रात्री ते आर्वी दूरक्षेत्र अंतर्गत कार्यरत होते. त्यांची पत्नीही बाहेरगावी गेली असल्याने चोरांनी घराचे कुलूप तोडून  20 हजार रुपये, मंगलपोत, तीन अंगठय़ा, सोन्याची वाटी, लहान मुलाच्या अंगठय़ा असा ऐवज चोरण्यात आला. सकाळी पाटील यांच्या घरासमोर राहणारे राठोड आणि शेलार हे त्यांचे बूट घालण्यासाठी गेले असता त्यांना बूट दिसले नाही. त्यावेळी त्यांना पाटील यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाटील यांना दूरध्वनी करुन चोरी झाल्याची माहिती दिली. शहर पोलिसांनाही चोरीची माहिती देण्यात आली.

मिल परिसरात तीसरी चोरी झाली. मिल परिसरातील अहिल्या देवी नगरातील रहिवासी सुनील सोनार यांच्या दुमजली घराचा कडी-कोयंडा गॅस कटरने कापून चोरी करण्यात आली. सोनार हे वरच्या मजल्यावरील घरात झोपलेले असतांना चोराने घरातून चांदीचे दागिने, देवीची मूर्ती आणि काही रोख रक्कम असा एकूण २० हजाराचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.