मुंबई: पोलीस वसाहतींतील पोलीस कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणी त्यांना हक्काची घरे मिळावीत अशी मागणी होत असतानाच शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या सहकारी सोसायट्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिस कर्मचारी वसाहतींमधील प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या अनुषंगाने सेवानिवृत्त पोलिसांसाठी तसेच दंडनीय शुल्कासंदर्भात शासनामार्फत नेमकी कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे, याबाबत स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या पगारातून घरभाडे भत्ता वजा करण्यात येतो. मात्र हा निधी नेमका कुठे आणि कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता करण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे. विविध पोलिस वसाहतींमधील घरांची दयनीय अवस्था पाहता त्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हा निधी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करून द्यावा, जेणेकरून त्याचा वापर निश्चितपणे पोलिस वसाहतींच्या दुरुस्ती आणि डागडुजीसाठी करता येईल, असे ठाकरे म्हणाले.
पोलिस कर्मचारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात येत असून त्याला मान्यता देण्यात यावी. २ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषद सभागृहात झालेल्या भाषणात अशा प्रस्तावांना शासनामार्फत निश्चितपणे मान्यता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
