परभणी :  ‘एफआरपी’च्या रक्कमेच्या मागणीकरिता सुकाणू समितीसह संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मौजे सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ‘ट्वेन्टी वन’ शुगर्सच्या कार्यालयासमोर सोमवारी सुरू केलेले  ठिय्या आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. मध्यरात्री सोनपेठ पोलिसांनी दहा आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि बुधवारी पहाटे चार वाजता सुटका केली.

शेतकरी सुकाणू समितीचे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सुधीर बिंदू, गणेश पाटील, विश्वांभर बोरवे, सुशील रेवडकर, कपील धुमाळ, राधाकिशन सुरवसे, दीपक बिडगर, रामभाऊ सूर्यवंशी, ज्ञानोबा वाघ आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत थकीत‘एफआरपी’ची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला होता.

दरम्यान, सोमवारी रात्रभर कारखान्यात मुक्काम केलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात कारखाना प्रशासनासोबत बैठक लावण्यात आली होती. या बैठकीत कारखान्याच्या वतीने विजय देशमुख यांनी ऊस ऊत्पादकांना उर्वरित रक्कम देण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यावर बैठक फिस्कटल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र करत ‘एफआरपी’ प्रमाणे पैसै मिळेपर्यंत कारखान्याबाहेर पडणार नसल्याचे जाहीर केले होते.

यावेळी कारखान्यात बसलेल्या शेतकऱ्यांनी भजन, कीर्तन, अभंग, गवळणी, भारुड सादर करीत आपले आंदोलन सुरूच ठेवले.

दरम्यान सोनपेठ पोलिसांनी विलास बाबर, परमेश्वर वाघ, मदनराव वाघ, शिवाजी सोनवणे, अंगद वैराणकर, अमोल मस्के, परमेश्वर मुंढे, अंगद मुंढे, शिवराम लोखंडे यांना अटक केली. त्यामुळे कारखानास्थळी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना पहाटे चार  वाजता चर्चा करीत सोडून दिले.

आंदोलनाची धार आणखी तीव्र करू

शेतकऱ्यांच्या घामाचे आणि हक्काचे पैसे देण्यात साखर कारखाना टाळाटाळ करत आहे. सत्तेच्या बळावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत असताना आंदोलनकत्र्या शेतकऱ्यांना अटक करून पोलिसांनी कोणती मर्दुमकी दाखवली आहे. शेतकरी यापुढे आंदोलनाची धार आणखी तीव्र करतील. आमच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. – कॉ. विलास बाबर, परभणी</strong>