इचलकरंजीतील पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि पोलिस नाईक विष्णू शिंदे यांना ६० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि पोलिस नाईक विष्णू शिंदे यांच्या विरोधात राजू पात्छापुरे यांनी तक्रार दाखल केली होती.
गुटखा विक्री संदर्भात सुरू असलेल्या कारवाईत मदत करुन पुन्हा कारवाई न करण्यासाठी दर महिना ६० हजार रुपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी संबंधित आरोपींनी केली होती. राजू यांनी तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक पदमा कदम यांच्या नेतृत्वाखाली या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार तक्रारदार राजू पात्छापुरे यांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि पोलिस नाईक विष्णू शिंदे यांना पैसे देण्यास तयारी दर्शवली. तसेच रक्कम घेण्यासाठी त्यांना इचलकरंजीतील दुर्गामाता गल्ली येथील राहत्या घरी बोलविण्यात आले. यावेळी आरोपी विष्णू रमेश शिंदे यांनी ६० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.