लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : रस्त्याच्या कडेला पडलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाताना भरधाव वेगातील मोटारीने जोरात ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सांगोला-पंढरपूर रस्त्यावर ही दुर्घटना घडली.

कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२, रा. पंढरपूर, मूळ रा. नांदेड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस अधिका-याचे नाव आहे. सोनकांबळे हे सहायक पोलीस निरीक्षकपदावर सांगोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. रात्री नऊच्या सुमारास सांगोला पोलीस ठाण्यातील कर्तव्य पूर्ण करून ते बुलेट दुचाकीने पंढरपूरकडे घरी परत निघाले होते. परंतु सांगोल्याजवळ फॅबटेक अभियांत्री महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला एक अपघातग्रस्त दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. तेव्हा सोनकांबळे हे स्वतःची दुचाकी थांबवून त्या जखमी दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. परंतु काही क्षणातच सांगोल्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा मोटारीने (एमएच १३ ईके १८९९) सोनकांबळे यांना जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-सांगली : शेंडगेंच्या मोटारीला चप्पलेचा हार, शाईफेक करत धमकीचा संदेश

दरम्यान, या दुर्घटनृची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारचालकाविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे.