सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षांत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २४४ आरोपींची पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षकांनी झाडाझडती घेतली. संशयितांचे मित्र कोण आहेत, व्यवसाय काय करतो, त्याची उठबस कुणासोबत आहे याची माहिती पोलीस दप्तरात अद्ययावत करण्याबरोबरच चांगली वर्तणूक ठेवा अन्यथा, कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत खून, खुनाचे प्रयत्न आदी प्रकार वाढत असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने गुन्हेगाराचे आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांगली, मिरज, विटा, तासगाव, इस्लामपूर आणि जत या पाच उपविभागात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना बोलावून विचारणा करण्यात आली.
गेल्या दहा वर्षांत खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर मारामारी आदी दोन व त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना झाडाझडतीसाठी पाचारण करण्यात आले होते. यामध्ये सांगली ३८, मिरज ४४, इस्लामपूर ४२, तासगाव ३७, विटा ३९ आणि जत ४४ अशा एकूण २४४ संशयितांची झाडाझडती घेण्यात आली.
आरोपी सध्या काय करत आहे, कुठे काम करत आहे, नातेवाईक कोण या माहितीसोबतच संबंधितांचे भ्रमणध्वनी क्रमांकही नोंद करण्यात आले. आरोपींनी या पुढे कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होऊ नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला. तसेच या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना देण्यात आल्या.