रवींद्र जुनारकर

दोन वर्षांपूर्वी नक्षलवादी सतीश याच्याकडून स्फोट

गडचिरोली : दोन वर्षांपूर्वी १ मे महाराष्ट्र दिनी कुरखेडा जवळील लेंढरी नाला येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडी स्फोटात १५ पोलीस शहीद झाले होते. या स्फोटाची कळ नक्षलवाद्यांच्या कंपनी क्र. चार दलमचा विभागीय समिती सदस्य तथा जहाल नक्षलवादी सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा याने दाबली होती. हा स्फोट घडवणारा सतीश  शुक्रवारी चकमकीत ठार झाल्याने पोलीस दलात आनंद व्यक्त केला जता आहे. दरम्यान, कसनसूर दलम कमांडर महेश संपूर्ण दलमला मृत्यूच्या दरीत ढकलून फरार असल्याची धक्कादायक माहिती आहे.

गुरुवारी पैडी-कोटमीच्या जंगलात नक्षलवादी व पोलीस चकमकीत तेरा नक्षलवादी ठार झाले. यामध्ये कसनसूर व कंपनी क्रमांक चार दलमच्या नक्षलींचा सहभाग आहे. मात्र यात विभागीय समिती सदस्य तथा जहाल नक्षलवादी सतीश उर्फ अडवे देवू मोहंदा हा ठार झाल्याने पोलीस दलात विशेष आनंद व्यक्त होत आहे. त्याला कारण दोन वर्षांपूर्वी १ मे महाराष्ट्र दिनी कुरखेडा जवळील लेंढरी नाला येथे नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला होता. या भयंकर स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. हा स्फोट घडवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत  सतीश  सक्रिय होता.  त्याचे तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी गोळा करण्याचे काम सुरूच होते. शुक्रवारी चकमकीनंतर पोलिसांनी मृत नक्षल्यांचे मृतदेह गोळा केले तेव्हा सतीशचा मृतदेह बघून पोलीस जवानांना विशेष आनंद झाला.

कालच्या चकमकीनंतर कसनसूर दलम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या दलमच्या सर्व सदस्यांना मृत्यूच्या दरीत लोटून दलम कमांडर अनेक वर्षांपासून फरार आहे. त्याचे अनेक सहकारीही ठार झाले. मात्र तो बेपत्ता असून तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी गोळा करत असल्याची माहिती आहे, असे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

गडचिरोलीतून नक्षल चळवळ आता संपुष्टात !

गडचिरोलीतून नक्षलवादी चळवळ आता संपुष्टात आली आहे. उत्तर व दक्षिण गडचिरोलीत चळवळीतील अनेक जुन्या सदस्यांनी आत्मसमर्पण केल तर अनेक नक्षली चकमकीत ठार झाले. उत्तर व दक्षित गडचिरोलीत आता नक्षल चळवळीला नेतृत्व नाही. प्रभाकर हा सध्या उत्तर गडचिरोली तर दक्षिणेत गिरीधर सक्रिय आहे. परंतु त्यांच्या मर्यादा आहेत. अशावेळी हिंसाचार सोडून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

बँडबाजा व आतषबाजीमुळे पोलिसांवर टीका

तेरा नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी बँडबाजा वाजवून तथा फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. मात्र या आनंदोत्सवावर आता टीका केली जात आहे. नक्षलवादाचा खात्मा करणे हे सरकार तथा पोलिसांचे कर्तव्य आहे. अशावेळी बँड वाजवून, आतषबाजी करून पोलीस काय संदेश देऊ इच्छितात, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.