केंद्र, तसेच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर यंदाची रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे संकेत विविध संघटनांकडून प्राप्त झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रथमच अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राम मंदिरात दुपारी रामजन्मोत्सव साजरा होतो. सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात येते. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र रामनवमी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्याची तयारी भाजपसह िहदुत्ववादी संघटनांनी सुरू केली आहे. वास्तविक, तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची शिवसेनेची परंपरा आहे. यंदा या शिवजयंतीत दरवर्षीइतका उत्साह नव्हता. आता भाजप, विश्व िहदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, दुर्गा वाहिनी यांसारख्या संघटनांनी रामनवमी उत्सव शक्तिप्रदर्शन करून साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या २ महिन्यांपासून रामनवमी उत्सवाची तयारी सुरू आहे. या संदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागरण करण्यात आले.
सकाळी १० वाजता जुना मोंढा परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात मोठा जनसमुदाय सहभागी होईल, अशी शक्यता आहे. शक्तिप्रदर्शनाची कुणकुण लागताच पोलीस प्रशासनानेही बंदोबस्ताची जय्यत तयारी केली. अतिसंवेदनशील भागात जादा कुमक पाठवण्यात आली. शिवाय समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक परमजीतसिंग दहिया यांनी सांगितले. राज्य राखीव दलाच्या पोलीस तुकडय़ा काही भागात तनात केल्या आहेत.