महंत नामदेव शास्त्रींना पोलिसांनी बजावली नोटीस

नामदेव शास्त्री यांना कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

भगवानगडावर दस-याच्या दिवशी होणा-या कार्यक्रमावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

भगवानगडावर दस-यानिमित्त होणा-या भाषणावरुन वाद निर्माण झाला असतानाच पोलिसांनी महंत नामदेव शास्त्री यांना नोटीस बजावली आहे. नामदेव शास्त्री यांना कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून खरवंडी परिसरातून ३० ते ४० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भगवानगडावर  दस-याला पंकजा मुंडे यांच्या भाषणावरुन वाद निर्माण झाला आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी गडावरुन राजकीय भाषण होणार नाही अशी भूमिका घेतली होती. पण पंकजा मुंडे यांंनी भगवानगडावर येणारच असा निर्धार केला आहे. पंकजा मुंडे एका ऑडिओ क्लिपमध्ये नामदेव शास्त्रींना बघून घेऊ अशी धमकी देत असताना समोर आल्याने वाद आणखी चिघळला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दस-याला भगवान गडावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. पोलिसांनी तब्बल ४०० हून अधिक जणांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि अनुचित घटना घडणार नाही अशी तंबी देणारी नोटीसच बजावली आहे.

भगवानगडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गडाला अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे. एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३२५ पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील मागवलेले अतिरिक्त पोलीस बळ भगवान गडावर तैनात असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police sent notice to namdev shastri over dussehra controversy of bhagwangad