महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणे उभारले जाणार, त्यामध्ये सगळ्या अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच असतील अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार संपले पाहिजेत यासाठी हे सरकार कटीबद्ध आहे. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. महिला सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मागील वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. केंद्राकडे मागितलेली रक्कम मंजूर न करता केंद्राकडून केवळ ९५६ कोटी १३ लाख रक्कम मंजूर करण्यात आली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आधार दिला असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठीही सरकार आग्रही असल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी सरकार कायदा करणार असल्याचीही घोषणा अजित पवार यांनी केली.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक तरतुदी सांगितल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही हे सरकार योग्य रितीने पावलं उचलत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.