सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मकरंद रानडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील या दोघांची केवळ पाच महिन्यात तडकाफडकी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय दबावातून या दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हलविण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
दरम्यान, रानडे यांच्या जागेवर नवे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रेय मंडलीक यांची नेमणूक झाली असून त्यांनी लगेचच सोमवारी सकाळी मावळते पोलीस अधीक्षक रानडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या ठिकाणी कोणाची नेमणूक झाली, हे समजले नाही.
यापूर्वी सुमारे पावणेतीन वर्षे सोलापूर ग्रामीणमध्ये राहिलेले राजेश प्रधान यांच्यानंतर मकरंद रानडे हे १८ फेब्रुवारी २०१४ रोजी रुजू झाले होते. तर पाठोपाठ अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील हेदेखील २४ फेब्रुवारी २०१४ रोजी रुजू झाले होते. रानडे यांनी अल्पावधीत प्रशासनावर उत्तमप्रकारे पकड घेऊन कारभार चालविला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत रानडे यांच्या प्रशासनाने प्रशंसनीय कामगिरी बजावली होती. तसेच पंढरपूरच्या आषाढी यात्रेत त्यांनी पोलीस सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन चोखपणे अमलात आणले होते. मात्र त्यांच्या कार्यकाळास उणेपुरे पाच महिनेही पूर्ण होत नाहीत, तोच अचानकपणे आणि अनपेक्षितपणे त्यांची बदली झाल्यामुळे हा विषय चर्चेचा झाला आहे.
रानडे यांनी यापूर्वी सोलापूर ग्रामीणमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. हा अनुभव पाठीशी घेऊन रानडे हे पोलीस अधीक्षकपदाचा कारभार सांभाळत असताना जिल्हा ग्रामीण भागातील काही सत्ताधारी पुढाऱ्यांबरोबर त्यांचा वाद झाला होता. विशेषत: एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाशी त्यांचे चांगलेच वाजले होते. या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित घालून रानडे यांना हलविण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, सोलापूर शहर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह शहरातील दोन पोलीस उपायुक्तांना बदलीची प्रतीक्षा आहे. प्रशासनावर म्हणावी तशी पकड नसलेले रासकर यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला असून त्यांची लवकरच बदली होणार असल्याचे बोलले जात असताना इकडे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रानडे यांनाच बदलीचा फटका बसल्याचे दिसून येते.