नक्षलवाद्यांना शस्त्र व अर्थपुरवठा करण्यात केवळ काँग्रेस नेते बंडोपंत मल्लेलवार एकटेच सहभागी नसून तेंदूपानांचे अनेक बडे व्यापारी व राजकारणी यात गुंतलेले असावेत, असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. दरम्यान, मल्लेलवारप्रकरणी काँग्रेसने बाळगलेले मौन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.या पक्षाचे स्थानिक नेते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत आहेत.
सार्वजनिक आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना स्फोटके व शस्त्राचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलिसांनी गेल्या शनिवारी काँग्रेसचे नेते बंडोपंत मल्लेलवार यांच्यासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रुग्णवाहिकेत असलेल्या चार आरोपींना अटक केली असून, मल्लेलवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी रवींद्र करपे सध्या फरारी आहेत. गेल्या चार दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात आता अटकेतील आरोपीच्या चौकशीतून नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. गेल्या ३० वर्षांपासून गडचिरोलीच्या राजकारणात सक्रिय असलेले व तेंदूपानांचा व्यवसाय करणारे मल्लेलवार हे एकटेच या प्रकरणात गुंतलेले नाहीत, तर या व्यवसायात असलेले अनेक बडे व्यापारी यात सहभागी असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
दरवर्षी तेंदूपानांचा हंगाम सुरू झाला की देशभरातील व्यापारी तसेच बिडी उत्पादक कंपन्यांचे प्रमुख या भागात तळ ठोकून असतात. केवळ २० दिवस चालणाऱ्या या तेंदूपानांच्या हंगामात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना नक्षलवाद्यांना कसे मॅनेज करायचे हे ठाऊक नसते. अशा वेळी हे व्यापारी स्थानिक राजकारण्यांची तसेच व्यापाऱ्यांची मदत घेतात.  नक्षलवाद्यांना खंडणी देण्याचा व्यवहार केवळ तोंडी असतो. या वेळी मध्यस्थ म्हणेल तेवढी रक्कम त्यांना द्यावी लागते. यातील किती वाटा नक्षलवाद्यांपर्यंत पोहचतो हे केवळ मध्यस्थालाच माहीत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असलेले मल्लेलवार दरवर्षी ही मध्यस्थाची भूमिका बजावत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या जानेवारीत वनखात्याने तेंदूपानाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करताच मल्लेलवार यांनी सर्वात आधी गडचिरोलीतील २९ घटक विकत घेतले होते. इतर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला असतानासुद्धा मल्लेलवार यांनी संघटनेच्या विरोधात जाऊन घेतलेला पुढाकार तेव्हा सर्वाना खटकला होता.
तेव्हापासूनच पोलीस त्यांच्या मागावर होते. प्रारंभीच्या काळात खंडणीची रक्कम रोख घेणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता पोलिसांचा ससेमिरा सुरू झाल्याने वस्तूच्या स्वरूपात मदत घेणे सुरू केले आहे. यातही मल्लेलवार आघाडीवर होते.

मल्लेलवारांमागे राजकीय शक्ती?
पंधरा दिवसांपूर्वी मल्लेलवार यांच्या सावली तालुक्यातील तेंदूपानाच्या कोठारावर पोलिसांनी छापा टाकला होता. तेव्हा काहीही हाती लागले नाही. या छाप्याची कल्पना असूनसुद्धा त्यांनी गेल्या शुक्रवारी नक्षलवाद्यांना स्फोटके पुरवण्याचे धाडस केले. त्यामुळे त्यांच्यामागे मोठी राजकीय शक्ती उभी आहे काय, असा पोलिसांना संशय आहे.