लोहारा तालुक्यातील जेवळी पश्चिम तांडा येथे पोलिओसदृश रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या रुग्णामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून या परिसरातील सहा गावांमध्ये पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस पाजण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील सहा वर्षांंपूर्वीही या परिसरात पोलिओसदृश रुग्ण आढळून आला होता. आता ही दुसरी घटना असल्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
जेवळी पश्चिम तांडा येथील नंदिनी पिंटू राठोड (वय ३) ही ११ ऑगस्ट रोजी तांडय़ातील शेवालाल मंदिरात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडली. यानंतर त्वरित पालकांनी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता, या मुलीचा कंबरेखालील भाग लुळा पडल्याचे जाणवले. याचे गांभीर्य ओळखून पुढील उपचारांसाठी नंदिनीला उमरगा येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. येथील डॉक्टरांना पोलिओचा संशय आल्याने ही बाब जिल्हा आरोग्य प्रशासनास कळविण्यात आली. ही माहिती मिळताच आरोग्य विभाग खडबडून जागा होत या बालकाचे स्टुल सँपल घेत तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. यानंतर तांडा परिसरातील पाच किलोमीटर परिघात येणाऱ्या जेवळी उत्तर, जेवळी दश्चिण, पूर्व तांडा, पश्चिम तांडा, रुद्रवाडी, फणेपूर या सहा गावात तातडीचे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे काम हाती घेतले असून आतापर्यंत या गावातील १ हजार १५० बालकांपकी १ हजार ७० बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे. याबाबत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर जाधव यांना विचारले असता, या बालकाचे स्टुल सँपल तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून हा अहवाल आल्यानंतरच या आजाराचे नेमके कारण कळेल. एक खबरदारीचा उपाय म्हणून पाच किलोमीटर परिसरातील गावातील बालकांना पोलिओ डोस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिओमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. यावर करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु अद्याप पूर्णत यश आले नाही. अधूनमधून कोठे तरी पोलिओचा रुग्ण आढळून येतो आहे. मागील सहा वषार्ंपूर्वी जेवळी परिसरातच पोलिओ सदृश रुग्ण आढळून आला होता. त्याचाही कमरेखालचा भाग निकामी झाला होता. सहा वर्षांंतील ही दुसरी घटना आहे.