सांगलीत पुलाच्या भूमिपूजनावेळी रंगले राजकीय मानापमान नाट्य

ब्रिटिशकालीन आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाल्याने कृष्णा नदीवर समांतर पूल फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला आहे.

आर्यिवन पुलाला समांतर पुलाच्या भूमिपूजनवेळी कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक.

काँग्रेसचा बहिष्कार तर भाजप-राष्ट्रवादीत फलक युद्ध

सांगली : राज्यात व महापालिकेत सत्तेसाठी एकत्र असतानाही काँग्रेसला वगळून सांगलीतील नवीन पुलाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा  पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी पार पडले. योग्य सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादावरून फलक युद्ध रंगलेले पाहण्यास मिळाले.

ब्रिटिशकालीन आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाल्याने कृष्णा नदीवर समांतर पूल फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे भूमिपूजन मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपचे स्वतंत्र फलक लावण्यात आले होते. राज्यमंत्री डॉ. विश्वाजित कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते.

मात्र अन्य पदाधिकाऱ्यांची नावे नसल्याने राज्यमंत्री कदम सांगलीत असूनही कार्यक्रमस्थळी आले नाहीत. याचबरोबर जयश्री पाटील, विशाल पाटील, उपमहापौर उमेश पाटील, गटनेते संजय मेंढे यांच्यासह सर्वच काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली व मिरज शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन राममंदिर ते मिरजेतील गांधी चौक हा मार्ग सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे.  तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची क्षमता वाढ करून आठशे खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेठ- सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असून याचेही काम लवकर करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे.

यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी सांगितले, या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर असून हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. हा पूल १३२ मीटर लांबीचा असून १२ मीटर रूंदीचा आहे. सांगलीवाडीच्या बाजूस ११२ मीटर व सांगलीच्या बाजूस ११० मीटर जोडरस्ते करण्यात येणार आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Political honors drama during bhumi pujan of sangli bridge akp

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या