मुंबई : वादग्रस्त ठरलेले क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि अटकवॉरंट निघाले. आता तुरुंगात जावे लागणार पाहताच त्यांची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. तुरुंगात जाण्याची वेळ येताच किंवा तुरुंगात असल्याने बाहेर येण्यासाठी बिघडल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या राजकीय नेत्यांची, बड्या असामींची संख्या वाढतच आहे. त्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी रुग्णालय हा त्यांच्यासाठी मोठाच आसरा ठरला आहे.
कोकाटे हे गेल्या आठवड्यापर्यंत ठणठणीत होते आणि विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासही उपस्थित होते. मात्र सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली आणि जिल्हा न्यायालयाने त्यांना तुरुंगात जाण्यास फर्मावल्यावर त्यांची तब्येत बिघडली आहे. या आदेशाला स्थगिती मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न असून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. तुरुंगात जाण्याचे टाळण्यासाठी किंवा तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी तब्येतीचे कारण देण्याची नेत्यांची प्रथा जुनीच आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे तुरुंगात होते आणि तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी बरेच आजार असल्याचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळविला होता. माजी मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीतील महाराष्ट्रसदन गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असताना आजारी पडले आणि त्यांना बऱ्याच प्रयत्नांनंतर वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक हे कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या कारणांवरुन तुरुंगात होते. मात्र अनेक आजार असून आणि त्यावर खासगी रुग्णालयातच उपचार होऊ शकतील, असे कारण देत मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळविला आहे. गेले वर्षभराहून अधिक काळ आजारपणावर उपचारांसाठी जामीन मिळविलेले मलिक हे आता महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी. त्याला अटक झाल्यावर लगेच अस्वस्थ वाटू लागले आणि तो रुग्णालयात दाखल झाला. त्याने दीर्घ काळ रुग्णालयातच मुक्काम ठोकला.
रुग्णालयात सुखसोयी
आरोपी किंवा कैद्याला तुरुंगात अनेक अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो. तेथील जेवण चांगल्या दर्जाचे नसते. पंखे नाहीत, डास चावतात, अंथरुण अस्वच्छ, स्वच्छतागृहे खराब, पिण्याचे पाणीही धड नाही, कोठडीत अनेक कैदी किंवा आरोपींबरोबर रहावे लागते, त्यांचा त्रास होतो. हे सर्व टाळण्यासाठी आरोपी किंवा कैदी हे रुग्णालयांचा आसरा घेतात. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना तेथे स्वतंत्र वॉर्डमध्ये बेड व अन्य सेवासुविधा उपलब्ध होतात. किंवा वैद्यकीय कारणास्तव खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जामीन मिळाल्यावर घरीही निवांत राहता येते. त्यामुळे राजकीय नेते असोत किंवा अन्य बडे प्रस्थ असलेली मंडळी आजारी असल्याचे कारण देत रुग्णालयांचा आसरा घेतात.
