कोल्हापूर : राजकीय मंडळीच्या देहयष्टीवरून त्यांचा नित्याचा व्यायाम किती नि कसा असेल असा प्रश्न पडावा. गोलमटोल तंदीलतनू असलेले हे नेते आज योगाचे केवळ महत्त्व सांगत राहिले नाही तर आसने करून दाखवत इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करताना दिसून आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपक्रमात आज राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील लोक सहभागी झाले होते.
जिल्ह्यात योग दिनानिमित्त विविध ठिकाणी नानाविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार, राज्य शासनाने योग दिवसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्याने शहर, गावांमध्ये सकाळी सामुदायिक योगासने करण्यात आली.
राज्याच्या आरोग्याची जबाबदारी असणारे प्रकाश आबिटकर व हसन मुश्रीफ हे दोन्हीही मंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजच्या योग दिवस उपक्रमात सहभागी होत प्रकृतीला साजेशा योगासनांचे लवचिक सादरीकरण केले. राज्याच्या राजकारणाचा तोल सांभाळणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील पहिल्या योग महाविद्यालय सुरू होणाऱ्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथे सामूहिक योगासन उपक्रमात ताल तोलताना योगासनाची प्रात्यक्षिके केली. पतंजली आणि योगाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
शिवाजी विद्यापीठात खासदार धनंजय महाडिक, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठांनी सहभागी होत योगासने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनावरील थेट मार्गदर्शनाची चित्रफीत सादर करण्यात आली. इचलकरंजीत भाजपच्या योगासन उपक्रमांमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष अमृत भोसले, संयोजक अरविंद माने यांनी योगाभ्यासाचे दर्शन घडवले. गोकुळ दूध संघात अध्यक्ष नविद मुश्रीफ हे कन्या, पुतणी, संचालक, अधिकाऱ्यांसह योगाभ्यासात दंग झाले होते.
काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सामूहिक योगासनात सहभाग दर्शवला नसला तरी समाज माध्यमात ‘ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग हे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेलं अनमोल वरदान आहे,’ असा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.