scorecardresearch

अर्थसंकल्पानंतरची राजकीय शेरेबाजी; वाचा कोण काय म्हणालं

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली. विरोधकांनी टीका केली. तर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

Maharashtra Politician on Union Budget 2023
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका असल्यामुळे पुर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. मोदी सरकारने बुधवारी ४५ लाख कोटींचं बजेट सादर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपण सादर करत असलेलं हे बजेट अमृत काळातलं पहिलं बजेट आहे असं म्हटलं आहे. मोदी सरकारचं हे बजेट महिला, लाभार्थी, शेतकरी, मध्यम वर्ग अशा सगळ्या मतदारांना समोर ठेवून सादर केलं गेलं अशी चर्चा होते असली तरी विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे तोंड भरून कौतुक केले. आम्ही आपल्यासमोर आजच्या दिवसभरातील अर्थसंकल्पावर आधारीत असलेल्या दहा बातम्या एकत्र करुन देत आहोत.

पुढीलवेळी हिंदीतून अर्थसंकल्प सादर करा – बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून एक मोठं विधान केलं आहे. अर्थसंकल्प इंग्रजीत सादर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला आहे. कुसुमाग्रज म्हणत होते भाषा मरते आणि त्यासोबतच देशही मरत असतो. या देशाची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे आणि लोहिया असे म्हणायचे की, ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या भाषेत तुम्ही सभागृहात बोललं पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला ते समजेल. म्हणून पंतप्रधान मोदींना आम्ही पत्र लिहिणार आहोत की पुढील वर्षीचं बजेट हे हिंदीमधून आलं पाहिजे. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? – मुख्यमंत्री

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करत असताना विरोधकांच्याही टीकेला उत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? हे दरवर्षी होणारं बजेट आहे. विरोधी पक्षाने खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. रेल्वेसाठी किती तरी मोठ्याप्रमाणात बजेट दिलं आहे. माझ्या माहितीनुसार २०१३ पासून ते आतापर्यंत नऊ पटीने रेल्वेसाठी बजेट वाढवलेलं आहे. सगळ्याच समाजघटकांना न्याय देण्याचं काम करण्यात आलं आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानला गेला आहे. कुठलाही असा घटक नाही की तो या अर्थसंकल्पात वंचित राहील. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आतापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती, तेवढी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे.” ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने – नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले की, या अर्थसंकल्पात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे ठोस काहीही नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द अर्थमंत्र्यांनी काढला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली – विनायक राऊत

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की, “हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात सवलती देण्याचा प्रयत्न केला असला तरी एक घोर निराशा खासकरून मुंबईकरांच्या पदरी आली आहे. मुंबईत सातत्याने पंतप्रधान मोदी यांचं येणं-जाणं वाढलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे.” ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प – मुनगंटीवार

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विरोधकांची स्क्रिप्ट सकाळीच तयार होती – फडणवीस

“विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की कसंही बजेट आलं तरी काय प्रतिक्रिया द्यायची. सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही. बजेटच्या मेरीटवरही ते बोलत नाहीत. कारण, मेरीट त्यांना पाहायचेच नाहीत. त्यांनी सकाळी जी प्रतिक्रिया ठरवली तीच प्रतिक्रिया त्यांना ऐकवायची आहे. म्हणून त्यांच्या प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया द्यावी, एवढा त्या प्रतिक्रियेत दमच नाही.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पर्यावरण पूरक योजनांचा अर्थसंकल्प – गडकरी

“या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य हे आहे की, सामान्य माणसाच्या आयुष्यात हवा-पाणी प्रदुषणाचे प्रश्न गंभीर आहेत. पर्यावरणपुरक धोरणामुळे या प्रदुषणात मोठी सुधारणा होईल. आधी मध्यमवर्गाविषयी विचार केला जात नव्हता. यावेळी पहिल्यांदा मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा दिला आहे. हा अर्थसंकल्प गरीबांचं, कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण करणारा आहे,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अर्थसंकल्पातल्या घोषणा भाजपाला पुन्हा सत्ता मिळवून देतील?

मोदी सरकारचं हे बजेट महिला, लाभार्थी, शेतकरी, मध्यम वर्ग अशा सगळ्या मतदारांना समोर ठेवून सादर केलं गेलं अशी चर्चा होते आहे.  सगळ्यांचा विचार काही प्रमाणात या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मोदी सरकारला सत्तेची हॅटट्रिक साधायची आहे. त्यामुळे हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात. ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 20:52 IST