Maharashtra Political News : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. असं असतानाच ऐन निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. तर दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी मुंबईबाबत मोठं वक्तव्य केलं. ‘आम्ही मुंबई १० मिनिटांत बंद पाडू शकतो’, असं संजय राऊतांनी म्हटलं, त्यांच्या या वक्तव्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, आज दिवसभरात काय घडलं? महापालिका निवडणुकांशी संबंधित ५ महत्त्वाच्या घडामोडी काय आहेत? जाणून घेऊयात.

“आम्ही मुंबई १० मिनिटांत बंद पाडू शकतो”, संजय राऊतांचं मोठं विधान

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं. एका मुलाखतीत बोलताना राऊत म्हणाले, “ठाकरे कधीच हद्दपार होणार नाहीत. आम्ही खूप निवडणुका हरलो आहोत, आम्ही खूप कमी निवडणुका जिंकलो आहोत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आमचं संघटन मजबूत आहे. आजही आम्ही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतो. ही आमची सर्वांत मोठी अचिव्हमेंट आहे. ठाकरे वाचले तर मराठी माणूस आणि मुंबई वाचेल. हे सर्वांना माहीत आहे. हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत आहे, विनोद तावडेंनाही माहिती आहे”, असं संजय राऊतांनी म्हटलं.

‘मुंबई १० मिनिटांत बंद पाडू’, राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “कोणात दम…”

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही अशा पोकळ धमक्यांना घाबरणारे लोक नाहीत. जर तुमची (उद्धव ठाकरेंची) ताकद एवढीच होती तर तुम्हीच आव्हान दिलं होतं की, जेव्हा शिंदे गुवाहाटीला गेले होते, तेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा त्यांना मुंबईत एन्ट्री करू देणार नाहीत. मात्र, तरी शिंदे मुंबईत आले, ५० आमदारांबरोबर आले, याच मुंबईच्या रस्त्यांवरून शिंदे आणि आम्ही राजभवनात गेलो, सरकार स्थापन केलं. त्यामुळे मुंबई बंद करणं तर सोडा, ते (संजय राऊत) त्यांच्या घराभोवतीचा परिसरही बंद करू शकले नाहीत. हे सगळं फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर दोन तासात मुंबई बंद होऊ शकत होती. मात्र, आता यांच्यात कोणात दम नाही. राऊत दिवसभर अशा पद्धतीचं फक्त बोलत असतात”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही…”; फडणवीसांनी बोलून दाखवली खंत

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांनी भाजपावर टीका केली होती. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, “मी युतीचा धर्म पाळला, पण अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. अजित पवारांनी जी वक्तव्यं केली ती वक्तव्यं मला पटलेली नाहीत. पण मी त्याचा प्रतिवाद केलेला नाही. या निवडणुकीत मी पहिल्या दिवशी पासून ठरवलं होतं की मित्र पक्षांवर टीका करणार नाही. ती मी केली नाही. दुसरं ठरवलं होतं की मी कुठल्याही नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईत उत्तरं मी देतो. विकासावर बोललं नाही तर लोकांना हे वाटू शकतं की आम्ही दुर्बल आहोत. पुणे- पिंपरीत मी युतीचा धर्म पाळला. अजित पवारांनी युती धर्म नाही पाळला.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसानी नाराजी व्यक्त केली.

‘…तर कोल्हापूरला जायला हव’, रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांची टीका

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धंगेकर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत चंद्रकात पाटील यांचे फोटो शेअर केले. त्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि गुंड निलेश घायवळ एकत्र असल्याचा दावा धंगेकरांनी केला. यावरून निशाणा साधत धंगेकर म्हणाले की,”गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे अमोल बालवडकर यांचं तिकीट कापलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पण एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफवली असती का? आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे. गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकात पाटलांनी बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हव”, असं म्हणत धंगेकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर टीका केली.

“काँग्रेसला वाचवायला गौतमी पाटील आलीय”, भाजपाची बोचरी टीका

चंद्रपुरात काँग्रेसने प्रचारसभेला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला बोलावलं होतं. यावरून भाजपाने काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “काँग्रेसची अवस्था वाईट झाली. काँग्रेसचा एकही नेता चंद्रपुरात यायला तयार नाही. त्यांना धडकी भरतेय. काँग्रेसला वाचवायला कोण आलंय? आमच्या आदरणीय गौतमीताई पाटील आल्यात. गौतमीताई पाटील आता मते मागतील. मग काँग्रेस निवडून आल्यावर, चिंता करू नका, तुमचे रस्ते, सफाई, नगरपालिकेचे प्रश्न गौतमी पाटीलच सोडवेल. एवढी काँग्रेसची वाईट अवस्था आहे?”