Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक याच महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपतो आहे. त्याआधी निवडणूक घेतली जाईल हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. अशात वंचित बहुजन आघाडीने देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे असा दावा केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ( Politics ) येत्या काळात काही घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?
वंचित बहुजन आघाडीच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात ( Politics ) राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा वंचितने केला आहे. तसंच आणखी एक महत्त्वाचा दावा वंचितने उद्धव ठाकरेंबाबत केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा नेमका दावा काय?
“वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर स्वतः कार चालवत गेले. उद्धव ठाकरेंची आणि त्यांची दोन तास बैठक झाली. त्यानंतर ६ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. दिल्लीत जाताना त्यांच्या बरोबर कोण होतं? दिल्लीत काय ठरलं? हे यांनी जनतेला सांगावं.” असं वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले सिद्धार्थ मोकळे?
आम्ही ही माहिती पक्षाकडे आली आहे ती जनतेला सांगत आहोत कारण आरक्षणवादी मतदारांना भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आरक्षणविरोधी आहेत हे पक्कं माहीत आहे. याच आरक्षणवादी मतदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांतील घडामोडी पाहता जर उलटसुलट राजकीय घडामोडी ( Politics ) पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी जनतेची, मतदारांची फसवणूक होईल. ती होऊ नये म्हणूनच ही माहिती आम्ही देत आहोत असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे?
सिद्धार्थ मोकळे यांनी जो दावा केला आहे त्याबाबत विचारलं असता सिद्धार्थ मोकळे यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती सार्वजनिक केली. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
© IE Online Media Services (P) Ltd