scorecardresearch

आर्यन साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकारण तापले

कारखाना पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व सध्या शिवसेनेत असलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित आहे.

आर्यन साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकारण तापले
आर्यन साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकारण तापले

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : संपूर्ण मालमत्तेची विक्री करूनही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आणखी २९० कोटी रुपयांचे थकीत कर्ज आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २१ कोटी रुपयांची देणी असलेल्या बार्शी तालुक्यातील खामगावच्या आर्यन साखर कारखान्याच्या प्रश्नावर स्थानिक राजकारण ढवळून निघत आहे.

हा कारखाना पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व सध्या शिवसेनेत असलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित आहे. या प्रकरणात त्यांचे कट्टर राजकीय विरोधक तथा भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत सोपल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करण्याची गर्जना केली आहे.

बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळय़ाभोपळय़ाचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षांला हिंसक घटनांचीही किनार आहे. सोपल यांनी यापूर्वी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वर्षांनुवर्षे संचालक आणि काही वर्षे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्याशीच संबंधित आर्यन शुगर्स कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज थकले आहे. थकीत कर्जाचा आकडा ३६० कोटींच्या घरात गेला असताना जिल्हा बँकेने आर्यन कारखान्याची संपूर्ण मालमत्ता जप्त केली होती. अलीकडेच या मालमत्तेचा लिलाव झाला. यात बीड जिल्ह्यातील येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी ६८ कोटी ६४ लाख रुपये किमतीत आर्यन साखर कारखाना खरेदी केला आहे. थकीत कर्ज आणि मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेत मोठी तफावत आहे. जिल्हा बँकेचे आणखी २९० कोटींचे कर्ज थकीत आहे. याशिवाय कारखान्याला ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची सुमारे २१ कोटींची तसेच कामगारांच्या थकीत पगाराची रक्कम देय आहे.

यासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेने वजनदार नेते व संचालकांशी संबंधित साखर कारखाने, शिक्षण संस्था व अन्य संस्थांना दिलेल्या वारेमाप कर्जाच्या मुद्दय़ावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित आहे. सध्या बँकेचा कारभार प्रशासकामार्फत चालतो. तथापि, आर्यन साखर कारखान्याशी आपला संबंध नसल्याचा दावा दिलीप सोपल हे करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी, आर्यन साखर कारखान्याशी तुमचा संबंध नाही तर कोणाचा आहे, असा सवाल करीत सोपल कुटुंबीयांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे आपण स्वत: पुढील आठवडय़ात तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. सोपल यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांचा मान-सन्मान ठेवत आलो. परंतु एवढीच मग्रुरी असेल तर इकडे ईडी आणि आयकर विभाग आहे. कोण कुठे जाऊन बसायला हवे, हे सोपल यांनाही चांगले माहीत आहे. त्यांचे काही मित्र तुरुंगात बसले आहेत. आर्यन कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कसा गैरव्यवहार झाला, याबाबतची तक्रार पोलीस खात्यात दिली आहे. पुढची तक्रार आपण पुढील आठवडय़ात सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) करणार आहे. ईडी चौकशी लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही आमदार राऊत यांनी ठणकावून सांगितले. आर्यन कारखान्याकडे जिल्हा बँकेसह ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना आणि कामगारांना देय असलेला पै ना पै वसूल होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोपल यांनाच एकेरी भाषा वापरायला येते तर आपणही त्यांच्यापेक्षा शंभर पट जास्त बोलू शकतो, अशा शब्दात त्यांनी प्रतिआव्हान दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या