कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण विभागाची नोटीस

जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाट प्रकरणाला वेगळे वळण

संग्रहीत छायाचित्र

करोना काळात तिप्पट वाढलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाट प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण लागले. या प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महापालिकेची बदनामी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी महापालीकेलाच कारणे दाखवा नोटीस पाठवून महापालिकेच्या कारभाराची एकप्रकारे पोलखोल केली आहे.

‘करोनाबाबत शासनाने जारी केलेल्या जैव वैद्यकीय कचरा नियमांचे पालन आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास कोल्हापूर महापलिका गंभीर नाही. यामुळे मानवी आरोग्यावर आणि आसपासच्या वातावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे,’ असा गंभीर शेरा या नोटीसमध्ये मारण्यात आला आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करू पाहणाऱ्या महापालिकेलाच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर द्यावे लागणार आहे.

कोल्हापुरात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट नियमाला बगल देऊन केली जात असल्याचा प्रकार, प्रजासत्ताक संस्थेने व्हिडिओ जारी करून उघडकीस आणला होता. या प्रकारातून होत असलेल्या गोरखधंद्यावर प्रकाश झोत टाकला होता.

करोनामुळे शहरातील दैनंदिन जैव वैद्यकीय कचरा संकलन १६०० किलो आहे, ते आता ४५०० किलो इतके वाढले असून, तळोजा येथील कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेवून महापालिकेचा कचरा संकलित केला जात आहे, असे महानगरपालिकेने पत्रकाद्वारे म्हटले होते. तर देसाई खात्रीशीर माहिती न घेता लोकांची दिशाभूल करीत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही महापौर, उपमहापौर यांनी जाहीर केले होते.

महापालिकेचा हलगर्जीपणा –
आंधळे यांनी महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांना जैव वैद्यकीय कचरा हाताळणी व व्यवस्थापन नियम भंग केल्याबाबत पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, प्रकल्प स्थळावर जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर घातक प्रकारे साठवलेले आहे. जैव वैद्यकीय कचऱ्यावर पाणी पडत असल्याने विषाणूच्या प्रसार होत आहे. जैव वैद्यकीय कचरा साठवणूक, वाहतूक व हाताळणी बाबतच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pollution department notice to kolhapur municipal corporation msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या