Pooja Chavan: संजय राठोड मुंबईत दाखल; उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?

कॅबिनेट बैठकीत हजर राहण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन वादात अडकलेले संजय राठोड १५ दिवसांनी सर्वांसमोर आल्यानंतर आता मुंबईत दाखल झाले आहेत. संजय राठोड यांनी बुधवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याने वादात अडकले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नाराजी जाहीर केलेली असून संजय राठोड दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संजय राठोड मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी कोणतंही भाष्य न करता ते निघून गेले. दरम्यान दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत संजय राठोड हजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याआधी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा- “महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री ठाकरे बोलणार नाहीत”

उद्धव ठाकरेंकडून कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीतील गर्दीची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना मुख्य सचिव संजय कुमार यांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या माणसालाही सोडणार नाहीत – संजय राऊत
“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

भाजपाकडून अटकेची मागणी
संजय राठोड यांनी अटक करुन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. “राठोड यांच्याविरोधात एवढे पुरावे उपलब्ध असताना अद्याप कारवाई का झाली नाही,” असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली असताना मंत्र्यांनीच ही गर्दी कशी जमवली,” असाही प्रश्न विचारला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pooja chavan case shivsena sanjay rathod arrives in mumbai sgy