राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे यवतमाळमध्ये गर्भपात झालेल्या पूजा राठोडनामक तरुणीशी जुळत असल्याने पूजा राठोड म्हणजेच पूजा चव्हाण होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सखोल तपास केल्यास या प्रकरणाच्या मुळाशी जाता येऊ शकते, इतक्या सर्व बाबी स्पष्ट असतानाही पुणे पोलिसांचा तपास नेमक्या निष्कर्षांवर का पोहोचत नसावा, याबाबतही आता विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या ध्वनिफितींमुळे वनमंत्री संजय राठोड व पर्यायाने ठाकरे सरकारच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने जाणीवपूर्वक हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी पूजा अरुण राठोड या नावाने शिवाजीनगर नांदेड, येथील एक २२ वर्षीय तरुणी दाखल झाल्याची नोंद आहे. या तरुणीवर अर्धवट अवस्थेतील गर्भपातासंदर्भात उपचार केल्याचे दस्ताऐवजात नोंदवले आहे. रुग्णालयातील महिला व प्रसूती कक्ष क्रमांक तीनमध्ये ही तरुणी दाखल होती. सहायक प्राध्यापक तथा युनिट प्रमुख डॉ. श्रीकांत वराडे यांच्या देखरेखीत या तरुणीवर उपचार झाल्याची नोंद आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कथित ध्वनिफितींमुळे चर्चेत आलेल्या तरुणाचे नाव अरुण राठोड आहे. योगायोगाने ६ फेब्रुवारीला येथे गर्भपातासंदर्भात उपचार झालेल्या तरुणीचे नावही पूजा अरुण राठोड असे नोंदवले आहे. मात्र हीच तरुणी पूजा चव्हाण होती का, याबाबत वानवाडी पोलिसांचा तपास अद्यापही पुढे सरकलेला नाही. तो का सरकला नसावा, हा खरा प्रश्न आहे. या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी वानवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तपास पथक यवतमाळात आले होते.

वानवाडी पोलिसांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून काही माहिती घेतली. यासंदर्भात गोपनीय अहवाल पुणे पोलीस घेऊन गेलेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ स्वत: एका तरुणीस पहाटे रुग्णालयात घेऊन येतात, तिला स्वत: दाखल करतात, तिच्यावर शल्यगृहात स्वत: उपचार करतात, या कामी ते वॉर्डात डय़ुटीवर असलेल्या अधिपरिचारिका किंवा परिचारिकेची मदत घेत नाहीत, युनिट दोनच्या प्रमुखांची डय़ुटी असताना युनिट एकचे प्रमुख तथा विभाग प्रमुख रुग्णास परस्पर पहाटे उपचारासाठी घेऊन येतात, हा सर्व घटनाक्रमच संशयास्पद  आहे. मात्र या दृष्टीने पोलिसांनी तपासच केला नसल्याचा आरोप यवतमाळच्या भाजप महिला आघाडी प्रमुख माया शेरे यांनी केला. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालयात सामान्य महिला रुग्णांना अनेक तास ताटकळत राहावे लागते, रहिवासी पुराव्याशिवाय दाखल करून घेतले जात नाही. तिथे या तरुणीस विशेष सुविधा मिळत असेल तर या प्रकरणात कुणी तरी मुख्य सूत्रधार असून त्यांना महाविद्यालयातील वरिष्ठांची मदत होत असल्याची शंका व्यक्त होत आहे. ही तरुणी तिच्या पतीसह उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली तेव्हा तिचे किंवा पतीचे आधारकार्ड, रेशनकार्ड आदी कागदपत्रांची नोंद का घेतली नाही, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘सीसीटीव्ही’ कॅमेरातील पुरावा नष्ट?

वैद्यकीय महाविद्यालयात दीडशेवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवाडी पोलिसांनी या सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणाच्या तपासणीची नोंद केली नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पाहिले असते तर  प्रकरणातील सत्य केव्हाच बाहेर आले असते, अशी प्रतिक्रिया यवतमाळच्या भाजप महिला आघाडी प्रमुख माया शेरे यांनी दिली. आतापर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरणातील पुरावा नष्ट करण्यात आला असावा, असेही त्या म्हणाल्या.

गर्भपात वैध की अवैध?

अतिरक्तस्राव व अर्धवट गर्भपात झाल्याने या तरुणीचे ‘क्युरेटिंग’ केल्याचे सांगण्यात येते. अर्धवट गर्भपात झाला तर तिच्यावर उपचार करणे जोखमीचे होते. याची पूर्वसूचना महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना का दिली नाही, हा वैध गर्भपात होता की अवैध, वैद्यकीय महाविद्यालयात येण्यापूर्वी तिच्यावर यवतमाळातील कोणत्या खासगी महिला व प्रसूतिरोगतज्ज्ञाकडे उपचार झाले, ती नांदेडची रहिवासी होती तर यवतमाळात उपचारासाठी कशी आली, ती खासगी वाहनाने आली की अन्य, हे वाहन कोणाचे, असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना पडले आहेत. मात्र यातील कोणत्याच बाजूने पूजाच्या आत्महत्येच्या २० दिवसांनंतरही पोलिसांनी तपास केला नसल्याचे दिसते. पहाटे दाखल झाल्यानंतर ही तरुणी ६ फेब्रुवारीलाच दुपारी साडेबारा वाजता स्वमर्जीने सुटी घेऊन अरुणसह निघून गेल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र ही तरुणी यवतमाळातून कोणासोबत, कोणत्या वाहनाने गेली, या दृष्टीनेही तपास झाला नाही. रविवारी पुणे येथे पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर हा घटनाक्रम पोलिसांच्या तपासाची मुख्य दिशा असायला हवा होता, मात्र अद्यापही पोलिसांना तपासाची दिशा गवसली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रश्न कायम..

पुणे पोलीस यवतमाळमध्ये चौकशी करून १० दिवस लोटले, तरीही पूजा अरुण राठोड हीच पूजा लहू चव्हाण आहे का, या तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा जबाब पुणे पोलिसांनी का घेतला नाही, या तरुणीस महाविद्यालयात दाखल करताना नोंदवलेल्या नांदेड येथील पत्त्यावर पोलिसांनी तपास केला काय, आदी प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

शस्त्रक्रियेनंतर रजा?

* पूजा अरुण राठोड या तरुणीवर आपण कोणतेही उपचार केले नाही. या तरुणीस प्रसूती व स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण यांनी दाखल केले होते. त्यांनीच तिच्यावर उपचार केले, असे महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीकांत वराडे यांनी स्पष्ट केले.

* हे प्रकरण तापल्यानंतर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री व प्रसूतिरोग विभाग प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण अचानक रजेवर का गेले, येथे तपासासाठी आलेल्या पुणे पोलिसांनी त्यांचा जबाब का नोंदवला नाही, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

* डॉ. चव्हाण आता रजेवरून परत आल्याची माहिती अधिष्ठात्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. डॉ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.