विद्यार्थ्यांना मनस्ताप

मुंबई/पुणे/नागपूर : आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. विभागाच्या ‘क’ गटातील पदांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका, असा ढिसाळ नियोजनाचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळानंतर परीक्षेच्या दिवशीही गोंधळ झाल्याने उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरोग्य विभागांतर्गत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून, गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर अशा दोन दिवशी या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. पुन्हा कोणताही गोंधळ होऊ नये आणि परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाने कंबर कसली होती.

रविवारी एकूण १७ जिल्ह्यांतील १०२५ केंद्रांवर ५२ संर्वगात या परीक्षा घेण्यात आल्या. सकाळच्या सत्रात २३८ ठिकाणी तर दुपारच्या सत्रात ७८७ ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. मुंबईतील साकीनाका, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी होत्या तर नाशिक व पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत. आठ ठिकाणी प्रश्नपत्रिका असलेल्या पेटीचे डिजिटल लॉक न उघडल्यामुळे पेटीचे लॉक कापून ते उघडावे लागले. काही ठिकाणी न्यासाचे परीक्षा पर्यवेक्षक न पोहोचल्याने ऐनवेळी आरोग्य विभागाला पर्यवेक्षक द्यावे लागले. या गोंधळात परीक्षा उशिराने सुरु झाल्या.

पुणे जिल्ह्यातील काही मोजकी केंद्रे वगळता सर्व ठिकाणी उमेदवारांना परीक्षेपूर्वी मनस्ताप सहन करावा लागला. सकाळच्या सत्रासाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचलेल्या उमेदवारांना चुकीच्या केंद्र क्रमांकामुळे परीक्षा केंद्रच सापडत नव्हते. पुण्यातील आझम कॅम्पस, सिंहगड इन्स्टिटय़ूट, चिंचवड येथील गीतामाता इंग्लिश मीडियम स्कूल अशा अनेक केंद्रांवर प्रचंड गोंधळ झाला. अनेक उमेदवारांना जवळपास तासभर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. काही ठिकाणी उमेदवारांची कडक तपासणी करून चप्पल, बूट काही न घालता परीक्षेला बसण्यास सांगितले होते, काही ठिकाणी उमेदवारांना मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली. परीक्षा केंद्रावर बारावी, पहिल्या वर्षांचे विद्यार्थी पर्यवेक्षक म्हणून होते, प्रश्नपत्रिका उशिरा मिळालेल्या उमेदवारांना वेळ वाढवून मिळाली, उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळण्यास उशीर झाला, तर काहींना पुरेसा वेळ मिळाला नाही. गोंधळामुळे संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रांबाहेर आंदोलन केले. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी केंद्रावर केंद्र संचालकच नसल्याचे उमेदवारांनी सांगितले.

नागपूर येथील गोविंदराव वंजारी महाविद्यालयावरील केंद्रावर कनिष्ठ लिपिक, दूरध्वनी चालक, औषध मदतनीस अशा वर्ग ‘क’च्या विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यावेळी कनिष्ठ लिपिक पदाच्या उमदेवारांना दूरध्वनी चालक तर दूरध्वनी चालक पदाच्या उमदेवारांना कनिष्ठ लिपिक पदाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. उमेदवारांसमोर प्रश्नपत्रिका येताच त्यांच्यामध्येही काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर काही वेळातच चूक लक्षात घेत केंद्रावरील परीक्षा नियंत्रकांनी प्रश्नपत्रिका परत घेतल्यावर त्या बदलून दिल्या. यामध्ये बराच वेळ निघून गेला. राधिकाताई पांडव महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना एक तास उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजताचा पेपर ११ वाजता देण्यात आला. यावेळी विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी पेपर असल्याचे कारण सांगण्यात आले. परीक्षा यंत्रणेतील चुकांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान असा मनस्ताप सहन करावा लागला.

मूळात परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी न्यासाची असताना ही परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावण्यात आली. आरोग्य आयुक्त रामास्वामी स्वत: पुण्यात कंट्रोल रुम तयार करून तीन दिवस मुक्काम ठोकून  सर्व तयारीचा आढावा घेत होते. दोन्ही आरोग्य संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह आरोग्य विभागाचे शेकडो डॉक्टर परीक्षा केंद्र तपासण्यापासून परीक्षा योग्य प्रकारे होतील याची काळजी घेत होते. मात्र, न्यासा कम्युनिकेशन्सने घातलेल्या गोंधळाचा फटका शेकडो परीक्षार्थीना बसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

न्यासावर मेहेरनजर का?

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत सातत्याने गोंधळ झाल्याने परीक्षेचे काम करणाऱ्या न्यासा कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशीही गोंधळ झाल्याने ‘न्यासा’ कंपनीचा ढिसाळ कारभार उघड झाला. त्यामुळे न्यासावर सरकारची मेहेरनजर कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्षाने आंदोलन करून आरोग्य विभाग आणि सरकारचा निषेध केला. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आझम कॅम्पस येथे आंदोलन केले. या परीक्षेच्या गोंधळास जबाबदार घटकांवर राज्य सरकार कारवाई करणार का, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी शासन घेणार आहे, की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू राहणार आहे, असे प्रश्न युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी उपस्थित केले. आरोग्य विभागाने राबवलेल्या या परीक्षेच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा शासनावरील विश्वास उडाल्याची भावना स्टुडंट हेिल्पग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी व्यक्त केली.

टोपे यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली. राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे न्यासा कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप भांडारी यांनी केला. या परीक्षा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असल्याने या परीक्षा नव्याने घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

किरकोळ अपवाद वगळता परीक्षा सुरळीत; सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई : साकीनाका येथे एका उमेदवाराने परीक्षा सुरू होण्याआधी प्रश्नपत्रिका घेतल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. पेपर फुटल्याच्या अफवा असून १०२५ पैकी १० केंद्रांवर झालेले काही प्रकार वगळता आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या, असे स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले. एका केंद्रावर ३६ उमेदवारांना दुसऱ्याच संवर्गाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने गोंधळ झाल्याची कबुलीही सरकारने दिली.  आरोग्य विभागातील ५२ संवर्गासाठी राज्यभरातील १०२५ केंद्रांवर चार लाख ५ हजार १७९ उमेदवारांनी दोन सत्रांत परीक्षा दिली. काही केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे इलेक्ट्रॉनिक सील उघडण्यास विलंब झाल्याने उमेदवारांना परीक्षेची वेळ वाढवून दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोंधळ असा..

अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रश्नपत्रिका वेळेत मिळाली नाही. काही ठिकाणी चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. केंद्रांवर उमेदवारांच्या बैठक क्रमांकांची नोंदही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. आठ ठिकाणी प्रश्नपत्रिका असलेल्या पेटीचे डिजिटल लॉक न उघडल्यामुळे पेटीचे लॉक कापावे लागले. ऐनवेळी काही परीक्षा कक्षांमध्ये एका बाकावर दोन विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.