मुंबई : शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीन बियाणांचा पुरवठा केल्या प्रकरणी कृषी विभागाने बियाणे कंपन्यांवर ६५ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात प्रामुख्याने मे. रवी सीडस् अॅण्ड रिसर्च प्रा. लि., बुस्टर प्लँट जेनेटिक्स प्रा. लि., पार्श्व जेनेटिक्स इंडिया एल. एल. पी. मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. संबंधित कंपन्यांना कायदेशीर कारवाईची प्रक्रिया कृषी विभागाने सुरू केला आहे.
सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा विदर्भ आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोमवार, १३ जुलैअखेर राज्यात ३७ लाख ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, लातूर, धाराशिव, या जिल्ह्यांतून कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या चार जिल्ह्यांत तक्रारींचे प्रमाण जास्त आहे.
सोयाबीनची अपेक्षित उगवण झाली नसल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एकूण १८ बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. खासगी कंपन्यांबरोबर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित म्हणजेच महाबीज विरोधातही ५८१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
महाबीजसह सर्व कंपन्यांमध्ये बियाणे प्रमाणिकरण अधिकारी असतो. हा अधिकारी बियाणे दर्जेदार असल्याचे प्रमाणपत्र देतो. या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बियाणे प्रमाणिकरण अधिकाऱ्यांसह कंपन्यांच्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आकडेवारी
राज्यातील सोयाबीन पेरणी क्षेत्र – ४५ लाख हेक्टर
यंदा १३ जुलैपर्यंत झालेली पेरणी – ३७. ३६ लाख हेक्टर
सोयाबीन बियाणांचा एकूण पुरवठा – ११,५३,७४५ क्विंटल
उगवणी बाबत आलेल्या तक्रारी – ६,३७०
सोयाबीनचे अप्रमाणित (निकृष्ट) नमुने – ४१०
बाधित क्षेत्र – ६,४४५ हेक्टर
बियाणे कंपन्यांवर ६५ गुन्हे दाखल
अमरावती विभागात सर्वाधिक गुन्हे
यंदाच्या हंगामात एकूण १८ बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. ज्या कंपन्यांच्या बियाणांचे नमुने अप्रमाणित निघाले आहेत. त्या सर्व कंपन्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. मंगळवारअखेर बियाणे कंपन्यांवर ६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे निविष्ठा आणि गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी दिली.
