केवळ  कथा-कादंबरी, कवितासंग्रह, ललितगद्य अशा लोकप्रिय साहित्याच्या प्रकाशनापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता वैचारिक साहित्याचा प्रकाशयात्री असा लौकिक अरुण जाखडे यांनी प्रस्थापित केला. त्यामुळे पद्मागंधा प्रकाशन या संस्थेलाही आपली ओळख मिळवून देण्यात जाखडे यशस्वी ठरले. वैचारिक लेखन मी नाही तर कोणी प्रकाशित करायचे, या भूमिकेतून प्रसंगी पदरमोड करून त्यांनी वैचारिक साहित्याला प्रकाशाची वाट दाखविली. त्यामुळेच डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. व. दि. कुलकर्णी, डॉ. गणेश देवी अशी लेखकांची मांदियाळी त्यांनी पद्मागंधा प्रकाशनशी जोडली. ‘पद्मागंधा’, ‘आरोग्य दर्पण’ आणि ‘उत्तम अनुवाद’ हे जाखडे यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित होणारे हे तीन दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी पर्वणी असायची.  नगर जिल्ह्यातील आष्टी हे जाखडे यांचे मूळ गाव. या लहानशा गावात टपाल कार्यालय, दवाखाना, एसटी असे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची वीस वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. माध्यमिक शिक्षणासाठी थोड्याशा मोठ्या गावात जाऊन वसतिगृहात ते राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नगर येथे झाले. बी. एस्सी.च्या प्रथम वर्षानंतर आलेल्या नैराश्यातून शिक्षणाला रामराम ठोकून ते कायम वास्तव्यासाठी गावी परतले. आईच्या आग्रहास्तव एक वर्षाने ते परत नगरच्या महाविद्यालयात दाखल झाले. त्या एका वर्षात निसर्गातच नाही, तर माणसे, कुत्री, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना ‘लोकसत्ता’च्या ‘इर्जिक’ या स्तंभलेखनासाठी झाला. या सदरलेखनासाठी त्यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार मिळाला होता.

पदवी संपादन केल्यानंतर जाखडे यांनी कायनेटिक इंजिनीर्अंरगमध्ये नोकरी केली. १९८२ मध्ये ते पुण्याला आल्यानंतर बजाज टेम्पोमध्ये रुजू झाले.  कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी जाखडे यांनी १९८८ मध्ये ‘पद्मागंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला. हीच पद्मागंधा प्रकाशनची सुरुवात ठरली. जाखडे यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी पद्मागंधाची निर्मिती म्हणजे वाचकांसाठी अभिजात साहित्याची पर्वणी हे समीकरणच जणू प्रस्थापित केले. मराठी प्रकाशक परिषद या संस्थेला चेहरा प्राप्त करून देण्याचे काम जाखडे यांनी केले.   

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

महाराष्ट्राच्या भाषिक सर्वेक्षणामध्ये ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्यासमवेत जाखडे यांनी मोलाचे योगदान दिले होते. या सर्वेक्षणाचे इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांतील ग्रंथ प्रकाशनाचे भरीव काम पद्मागंधा प्रकाशनने आत्मीयतेने केले होते. भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान एका प्रकाशकाला लाभावा या उद्देशातून  पिंपरीर-चिंचवड येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. जाखडे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परि़षदेचा पुरस्कार मिळाला होता.

आ द रां ज ली

एक चांगला माणूस, चोखंदळ प्रकाशक, चांगल्या कल्पनाशक्तीचा लेखक, चांगला शेतकरी आणि धडाडीचा अभियंता हे गुण असलेल्या जाखडे यांच्या रूपाने चांगला मित्र गमावला याचे दु:ख मोठे आहे. महाराष्ट्राच्या भाषिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्वेक्षणाचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये प्रकाशन झाले. हे त्यांचे कामही भरीव कार्य आहे. – डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ 

घरची कोणतीही साहित्यिक पाश्र्वभूमी नसताना उपजत साहित्यप्रेमातून बजाजमधील सुखाची नोकरी सोडून अरुण जाखडे प्रकाशन व्यवसायाकडे वळले. प्रस्थापित लेखकांपेक्षा नवे विषय, नवे लेखक शोधत राहिले. त्यांची पुस्तके प्रकाशित करून स्वत:ची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. 

– दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

लेखक-प्रकाशक संबंध ओलांडून आमचे आणि जाखडे यांचे कौटुंबिक संबंध होते. लेखकाविषयी आत्मीयता असणारा, पुस्तकामध्ये ज्याचं आतडं गुंतलं आहे असा हा प्रकाशक होता. ‘मी अण्णांमुळे (डॉ. रा. चिं. ढेरे) ग्रंथप्रकाशक झालो’, असे जाखडे नेहमी अभिमानाने सांगायचे.  ‘इर्जिक’ हे त्यांचे पुस्तक संपूर्ण ग्रामसंस्कृतीचे उत्तम दस्तावेजीकरण आहे.

– डॉ. अरुणा ढेरे, माजी संमेलनाध्यक्षा

पूर्ण सभ्य माणूस, उत्तम ललित लेखक, प्र्रिंन्टग टेक्नॉलॉजीचं अद्ययावत ज्ञान असलेला सजग अभ्यासक आणि पुरोगामी भूमिका घेणारा बाणेदार प्रकाशक म्हणजे अरुण जाखडे…! अरुण जाखडे नावाच्या या सुंदर संस्कृतीनं मला समृद्ध केलं. मी त्यांच्यात एक निरामय माणूस अनुभवला.

– यशवंत मनोहर, ज्येष्ठ कवी

अरुण जाखडे यांचे जाणे ही फारच धक्कादायक बातमी आहे. सुनील मेहता यांच्या शोकसभेला ते उपस्थित होते. त्या वेळी असे काही होईल असे कोणालाच वाटले नसेल. दर्जेदार, वैचारिक, समीक्षात्मक पुस्तकांच्या प्रकाशनाचे एक अत्यंत अवघड काम त्यांनी पद्मागंधाच्या स्थापनेपासून यशस्वीपणे पेलले. आठवडाभरात दुसरा मोठा जिद्दी प्रकाशक गेला ही खरोखरच प्रकाशन व्यवसायाची फार मोठी हानी आहे.

– राजीव बर्वे,  अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ

अरुण जाखडे यांच्या निधनाने प्रकाशन व्यवसायातील खूप मोठा माणूस गेला. मराठी प्रकाशक परिषदेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. उत्तम लेखक, संपादक यापेक्षाही ते उत्तम माणूस होते.

– अर्रंवद पाटकर, मनोविकास प्रकाशन

अरुण जाखडे यांनी लिहिलेली-संपादित केलेली पुस्तके

’ इर्जिक (‘लोकसत्ता’तील सदरलेखनामधील लेखांचा संग्रह)

’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

’ पाचरुट (कादंबरी)

’ पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)

’ Peoplel s Linguistic Survey of India  The Languages of Maharashtra – १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक : गणेश देवी)

’ प्रयोगशाळेत काम कसे करावे

’ भारताचा स्वातंत्र्यलढा

’ भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण

’ विश्वरूपी रबर

’ शोधवेडाच्या कथा

’ हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)