केवळ  कथा-कादंबरी, कवितासंग्रह, ललितगद्य अशा लोकप्रिय साहित्याच्या प्रकाशनापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता वैचारिक साहित्याचा प्रकाशयात्री असा लौकिक अरुण जाखडे यांनी प्रस्थापित केला. त्यामुळे पद्मागंधा प्रकाशन या संस्थेलाही आपली ओळख मिळवून देण्यात जाखडे यशस्वी ठरले. वैचारिक लेखन मी नाही तर कोणी प्रकाशित करायचे, या भूमिकेतून प्रसंगी पदरमोड करून त्यांनी वैचारिक साहित्याला प्रकाशाची वाट दाखविली. त्यामुळेच डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. व. दि. कुलकर्णी, डॉ. गणेश देवी अशी लेखकांची मांदियाळी त्यांनी पद्मागंधा प्रकाशनशी जोडली. ‘पद्मागंधा’, ‘आरोग्य दर्पण’ आणि ‘उत्तम अनुवाद’ हे जाखडे यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित होणारे हे तीन दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी पर्वणी असायची.  नगर जिल्ह्यातील आष्टी हे जाखडे यांचे मूळ गाव. या लहानशा गावात टपाल कार्यालय, दवाखाना, एसटी असे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची वीस वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. माध्यमिक शिक्षणासाठी थोड्याशा मोठ्या गावात जाऊन वसतिगृहात ते राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नगर येथे झाले. बी. एस्सी.च्या प्रथम वर्षानंतर आलेल्या नैराश्यातून शिक्षणाला रामराम ठोकून ते कायम वास्तव्यासाठी गावी परतले. आईच्या आग्रहास्तव एक वर्षाने ते परत नगरच्या महाविद्यालयात दाखल झाले. त्या एका वर्षात निसर्गातच नाही, तर माणसे, कुत्री, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना ‘लोकसत्ता’च्या ‘इर्जिक’ या स्तंभलेखनासाठी झाला. या सदरलेखनासाठी त्यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदवी संपादन केल्यानंतर जाखडे यांनी कायनेटिक इंजिनीर्अंरगमध्ये नोकरी केली. १९८२ मध्ये ते पुण्याला आल्यानंतर बजाज टेम्पोमध्ये रुजू झाले.  कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी जाखडे यांनी १९८८ मध्ये ‘पद्मागंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला. हीच पद्मागंधा प्रकाशनची सुरुवात ठरली. जाखडे यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी पद्मागंधाची निर्मिती म्हणजे वाचकांसाठी अभिजात साहित्याची पर्वणी हे समीकरणच जणू प्रस्थापित केले. मराठी प्रकाशक परिषद या संस्थेला चेहरा प्राप्त करून देण्याचे काम जाखडे यांनी केले.   

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular literature such as stories novels poetry collections fine prose akp
First published on: 17-01-2022 at 00:20 IST