देशाच्या दक्षिण भागात सक्रिय असलेला भाकप एमएल नक्षलबारी हा पक्ष भाकप माओवादी या पक्षात विलीन झाल्याचे नक्षलवाद्यांनी जाहीर केले असून यामुळे ही हिंसक चळवळ मोठी किनारपट्टी लाभलेल्या पश्चिम घाटात सक्रिय होईल, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
देशाच्या मध्य भागातील जंगलात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आता संघटनात्मक पातळीवर सुसूत्रता आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २० वर्षांपासून दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये सक्रिय असलेल्या भाकप मार्क्‍स लेनिन नक्षलबारी या पक्षाचे भाकप माओवादीमध्ये विलीनीकरण झाल्याचे नक्षलवाद्यांचा प्रमुख गणपतीने एका पत्रकातून जाहीर केले आहे. एरवी कोणताही निर्णय प्रवक्त्यांच्या माध्यमातून जाहीर करणाऱ्या या चळवळीने यावेळी प्रथमच गणपतीला समोर केले आहे. या पत्रकावर भाकप एमएल नक्षलबारी या पक्षाचा सचिव अजितचीही स्वाक्षरी आहे. केरळमध्ये अनेक हिंसक कारवाया करणाऱ्या या पक्षाने आजवर आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखले होते. २१ सप्टेंबर २००४ ला देशात वेगवेगळय़ा नावाने सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी अबूजमाड पहाडावर एकत्र येत भाकप माओवादी हा पक्ष स्थापन केला होता. क्रांतीच्या मार्गाने सत्ता असे माओचे सूत्र सांगत हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या या पक्षात सामील होण्यास तेव्हा केरळमधील या पक्षाने नकार दिला होता.

१ मेचा मुहूर्त
भाकप एमएल नक्षलबारी या पक्षाचे दक्षिण भारतात अनेक सक्रिय सदस्य असून ते क्रांतीचा पुरस्कार करण्यात आघाडीवर आहेत. नक्षलवाद्यांना आता हे सदस्य मिळाल्याने मोठी किनारपट्टी लाभलेल्या पश्चिम घाटात ही चळवळ भविष्यात सक्रिय होईल, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. पश्चिम घाटात घनदाट जंगल असून केरळपासून कोकणपर्यंतची किनारपट्टी या घाटाला लागलेली आहे. या भागात नक्षलवादी सक्रिय झाले तर सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी निर्माण होईल, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. या विलीनीकरणामुळे आता देशात माओचा विचार पुढे नेणारा आमचाच एकमेव पक्ष शिल्लक राहिला आहे, असा दावा गणपतीने गेल्या १ मे रोजीच्या पत्रकात केला आहे.