राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठय़ावर मर्यादा घालण्यात आली होती. उत्तरेकडील पाच राज्येही आता १ एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आली आहेत, मात्र त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि विशेषत: युक्रेनमधील युद्धाचा परिणाम तेल दरवाढीवर कायम राहिला आहे. त्याचप्रमाणे साठा मर्यादेमुळे तेल विक्रीबाबत हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यात स्थिरावलेले तेलाचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यांत तेलबिया तसेच तेलसाठय़ावर मर्यादा नव्हती. १ एप्रिलपासून केंद्राने उत्तरेकडील पाच राज्येही साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत. सर्व राज्यांत तेलबिया, तेलसाठय़ावरील मर्यादा डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहेत. साठा मर्यादेत तेलबिया, तेल आणल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम तेलाच्या आवकेवर झाला आहे. भारतात दरवर्षी १५० ते १६० लाख टन तेल आयात केले जात असल्याचे मार्केट यार्डातील तेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.

दरवर्षी ७० ते ८० लाख टन पामतेल आयात केले जाते. साधारणपणे ७० टक्के पामतेल इंडोनेशियातून आयात केले जाते. मलेशियातून २० टक्के तेल आयात केले जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे. दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. त्यापैकी ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकटय़ा युक्रेनमधून होते. उर्वरित आयात रशिया, अर्जेटिनातून होते. सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते. तेथील हवामानातील बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा विचार करून यापुढील काळात टप्प्याटप्प्याने तेलाचे दर वाढणार आहेत, याकडे गुजराथी यांनी लक्ष वेधले.

महानगरापासून ग्रामीणपर्यंत ५० टनांची मर्यादा

साठा मर्यादेमुळे खाद्यतेलाचे दर तात्पुरते घटतात. साठा मर्यादा हा काही तेल दरवाढ आटोक्यात आणण्यासाठीचा दीर्घकालीन उपाय होऊ शकत नाही. स्पर्धा वाढत आहे. एका व्यापाऱ्याला ५० टनांची साठा मर्यादा दिली आहे. व्यापाऱ्याकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाली की आपोआप तेलाचे दर स्थिरावतात. साठा मर्यादेमुळे व्यापारीही तेलविक्री करताना हात आखडता घेतात, असा अनुभव आहे. साठा मर्यादेमुळे तेलाचे दर कमी होत नाहीत. पूर्वी लोकसंख्या विचारात घेऊन साठा मर्यादा निश्चित करण्यात आली होती. आता महानगरापासून ग्रामीण भागापर्यंत सरसकट ५० टनांची साठा मर्यादा दिली आहे, असे खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी सांगितले.

एप्रिलमधील भाव रुपयांत

(१५ लिटर डब्याचे) 

सूर्यफूल २५५० ते २७००

पामतेल        २२०० ते २४००

शेंगदाणा २६५० ते २७५०

सरकी   २४०० ते २६००