scorecardresearch

मका, सोयाबीन व कडधान्याच्या क्षेत्रात मोठय़ा वाढीची शक्यता; जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

जिल्ह्याच्या आगामी खरीप हंगामात मका, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ कृषी विभागाला अपेक्षित आहे.

नगर : जिल्ह्याच्या आगामी खरीप हंगामात मका, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ कृषी विभागाला अपेक्षित आहे. या पिकांना यापूर्वी मिळालेला चांगला बाजारभाव व वाढलेली उत्पादनक्षमता यामुळे शेतकऱ्यांचा कल कडधान्याकडे वाढू लागला आहे. कडधान्याचे क्षेत्र आता सरासरी ७८ हजार हेक्टरवरून २ लाख हेक्टरवर पोचले आहे. सोयाबीन क्षेत्रातही दुपटीने वाढ झाली आहे. खरीप हंगामपूर्व नियोजनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३०) नगरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार, खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून हा अंदाज वर्तवला गेला आहे.  जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र सरासरी ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. परंतु कृषी विभागाने ६ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात विविध हंगामातील, सर्व प्रकारच्या कांदा क्षेत्रातही मोठी वाढ झालेली आहे. कांद्याचे सरासरी क्षेत्र ९६ हजार हेक्टर असते, तेही आता २ लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात मक्याचे सरासरी ३३ हजार हेक्टर क्षेत्र असते ते आता ७३ हजार हेक्टरवर गेले आहे. सोयाबीनचे क्षेत्र सरासरी ५४ हजार हेक्टर असते ते गेल्या वर्षी १ लाख १८ हजार तर यंदा १ लाख २६ हजार हेक्टरवर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.  सोयाबीनचे घरी तयार केलेले बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडे ९४ हजार क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची विक्री सुरू झाली आहे. याशिवाय १५९३ हेक्टरवर बियाणे तयार करण्यात आले, त्याद्वारे १५ हजार क्विंटल बियाणे आणखी उपलब्ध होणार आहे. या सर्वाची उगवण क्षमता तपासण्याचे काम सुरू असून ७० टक्केपेक्षा अधिक उगवण क्षमता असलेल्या बियाणांची शेतकरी व शेतकरी गटांना विक्री सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

७२४० मे. टन खतांचा बफर साठा खरीप हंगामासाठी २ लाख २५ हजार ५०० मे. टन कथांचे आवंटन मंजूर झाले आहे. गेल्यावर्षीचा ६३ हजार ६६५ मे. टन शिल्लक साठा व यंदा नव्याने आलेला ७८४५ मे. टन असा एकूण सध्या ७२ हजार ४०९ मे. टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. दुसऱ्याचा ७२४० व ‘डीईएपीए’चा १९७० असा एकूण ७२४० मे. टन ‘बफर’साठा तयार करण्यात आला आहे. 

 ७० हजार क्विंटल बियाणांची मागणी

विविध बियाणांची ७० हजार क्विंटल मागणी जिल्ह्यासाठी नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी ५५ ते ६० हजार क्विंटल पुरवठा होत असतो. त्यातील ४८ ते ५२ हजार क्विंटल विक्रीस उपलब्ध होतो. कृषी सेवाकेंद्रांनी कोणत्याही प्रकारे ‘लिंकिंग’ व्यवहार करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व गुणवंतांचा गुणवत्ता नियंत्रणासाठी १५ भरारी पथके कृषी विभागाने स्थापन केली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Potential growth maize soybean pulses hectare area proposed ysh

ताज्या बातम्या